हे ठरले जगातील भाग्यवान घर

डोंगरात वसलेले एक घर भाग्यवान घर म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्पेन मध्ये ला पाल्माच्या अटलांटिक बेटावर असलेले हे घर येथे ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणावर लाव्हा वाहून सुद्धा सुरक्षित राहिले आहे आणि हा एक चमत्कार मानला जात आहे.

ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यावर धगधगत्या लाव्हाने या परिसरातील सुमारे ३५० घरे,शाळा व अन्य परिसर जाळून कोळसा केला आहे मात्र या घराला किंचित सुद्धा धक्का लागलेला नाही. ज्वालामुखीचा स्फोट होताच प्रशासनाने येथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असून नागरिक जीव वाचविण्यासाठी सगळे सोडून गेले. पुन्हा या परिसरात काही दिसेल अशी कुणालाच आशा नव्हती पण या छोट्या घरामुळे त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

हे घर एका निवृत्त जोडप्याचे आहे. आपले घर सुस्थितीत आहे हे ऐकून त्यांना आनंदाश्रू आवरेनात. त्यांचा या बातमीवर विश्वासच बसला नाही. ज्या बिल्डरने हे घर बांधले त्याचा आनंद मात्र अवर्णनीय आहे. आपला व्यवसाय वाढेल अशी त्याला आशा वाटते आहे. अर्थात या भागातील धोका अजून कमी झालेला नाही त्यामुळे प्रशासनाने स्थानिकांनी तेथे जाऊ नये असे आवाहन केले आहे.

पूर्वी १९४९ आणि १९७१ अश्या दोन वेळा या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता असेही समजते.