अनेक देशांची बंदी, तरी या कंपन्या स्वीकारतात बीटकॉईन

बीटकॉईन आणि तत्सम आभासी चलन म्हणजे क्रिप्टोकरन्सीवर अनेक देशात बंदी आहे तर काही देशांनी त्यांना परवानगी दिली आहे. मात्र उद्योगक्षेत्रातील अनेक कंपन्या बीटकॉईन स्वीकारून त्यांची उत्पादने विकत आहेत. चीनने बीटकॉईनवर बंदी घातली आहे. भारताने सुद्धा काही काळापूर्वी बीटकॉईनवर बंदी घातली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती उठविल्यावर भारत सरकार आता त्या संदर्भात कायदा पास करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक भारतीय क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करत असल्याचेही दिसून आले आहे.

मात्र जगातील अनेक दिग्गज कंपन्या बीटकॉईनचा स्वीकार करत आहेत. दिग्गज जर्मन ओटो कंपनी बीएमडब्ल्यू इंग्लंड आणि कॅनडा येथे त्यांच्या कार खरेदी करणाऱ्यांना बीटकॉईन मध्ये पैसे देण्याचा पर्याय देत आहे. टेस्लाने सुद्धा काही काळापूर्वी बीटकॉईन स्वीकारली जातील अशी घोषणा केली होती. कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांनी बीटकॉईनमध्ये फेब्रुवारी २०२१ मध्ये दीड अब्ज डॉलर्सची गुंतवणूक सुद्धा केली आहे. मात्र आता त्यांनी त्यांचा निर्णय बदलून बीटकॉईन स्वीकारली जाणार नाहीत असा खुलासा केला आहे.

सोफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्टचे गेम्स आणि अन्य सेवा बीटकॉईन देऊन खरेदी करता येतात. स्वायर कंपनीने बीटकॉईन मध्ये १७० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. विकिपीडिया ऑनलाईन डोनेशन बीटकॉईन स्वरुपात स्वीकारते. ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी एक्सपिडीया सुद्धा बीटकॉईन स्वीकारते.

फूड क्षेत्रातील स्टारबक्स, बर्गर किंग आणि पिझा हट व्हेनेझुएला मध्ये बीटकॉईन स्वीकारत आहे तर कोका कोला आशिया पॅसीफिक रिजन मध्ये बीटकॉईन आणि अन्य क्रिप्टो करन्सी स्वीकारत आहे.