साधू संन्यासींचे असे होतात अंत्यसंस्कार

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांना प्रयागराज मध्ये भूसमाधी दिली गेली आहे. त्यानंतर साधू संन्यासी यांच्यावर कश्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात याची अनेकांना उत्सुकता आहे. आमच्या वाचकांसाठी त्या संदर्भात येथे माहिती देत आहोत.

संत परंपरा आणि संप्रदायानुसार साधू संन्यासीवर अंत्यसंस्कार केले जातात. वैष्णव संत संन्यासीवर अग्नीदाह पद्धतीने संस्कार होतात तर संन्यासी परंपरेत तीन प्रथा नुसार अंतिम संस्कार होतात. वैदिक पद्धतीने दाह संस्कार, जलसमाधी आणि भूसमाधी असे हे प्रकार आहेत. काही वेळा संबंधित संन्याश्याच्या अंतिम इच्छेप्रमाणे देह जंगलात सोडून दिला जातो.

रामायण, महाभारत आणि अन्य हिंदू पौराणिक ग्रंथात भारतीय संताना जलसमाधी देण्याचे उल्लेख आहेत आणि पूर्वी तीच पद्धत उपयोगात होती मात्र जलप्रदूषण वाढू लागल्यानंतर भूसमाधी परंपरा सुरु झाली असे सांगतात. समाधी अवस्थेत बसल्या स्थितीतच समाधी दिली जाते. त्यावेळी जी मुद्रा असते त्याला सिध्द योग मुद्रा म्हणतात.

अघोरी पंथाचे साधू जिवंतपणीच अंत्यसंस्कार करून घेतात. त्यामागे परिवार त्याग आणि ब्रह्मचर्य असा उद्देश असतो. जिवंतपणीच अंत्यसंस्कार करून घेतले की ती व्यक्ती, त्याचा परिवार आणि जगासाठी मृत मानली जाते.

मुस्लीम समाजात सरळ झोपलेल्या अवस्थेत मृतदेह दफन केला जातो. ख्रिश्चन समाजात प्रेतयात्रा काढून दफन केले जाते तर पारसी समाजातील धार्मिक गुरुंचे मृतदेह खास छतावर ठेवले जातात. गिधाडे आणि घारी हे मृतदेह खातात.