नवी दिल्ली : एक खळबळजनक बातमी राजधानी दिल्लीतून समोर आली आहे. दिल्लीतील रोहिणी न्यायालय परिसरात झालेल्या गोळीबारात जितेंद्र गोगी नावाच्या गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. टिल्लू गँगचे हे शूटर असून ते वकिलाच्या वेशात आले होते. जितेंद्र गोगीवर गोळी झाडणाऱ्या दोघांचा दिल्ली पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे.
दिल्ली न्यायालय परिसरात थरार; वकिलाच्या वेशात आलेल्या शूटर्सकडून गँगस्टरची गोळ्या घालून हत्या
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गॅंगस्टर जितेंद्र गोगीला दिल्लीतील रोहिणी न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. यावेळी वकिलाच्या वेशात आलेल्या शूटर्सनी त्याच्यावर गोळीबार केला. यात त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरात कारवाई करत शूटर्सचा एन्काऊंटर केला. ही घटना रोहिणी न्यायालयाच्या रूम नंबर-207 मध्ये घडली. या शूटआऊटमध्ये चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टिल्लू गॅंगच्या दोघांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला आहे. वकिलांचा ड्रेस घालून हे दोघे रोहिणी न्यायालयात आले होते. त्यांनीच जितेंद्र गोगीला गोळी मारली. टिल्लू गॅंगच्या या दोघांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. ही घटना गँगस्टर गोगी आणि टिल्लू गॅंगमधील पूर्व वैमनस्यातून घडली आहे. दरम्यान न्यायालयाच्या परिसरात भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिस प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.