नवी दिल्ली – स्वदेशी बनावटीच्या अर्जुन रणगाड्याची नवी आवृत्ती भारतीय लष्कराला मिळणार आहे. ११८ ‘अर्जुन एमके-१ ए’ रणगाड्यांची ऑर्डर संरक्षण दलाने चेन्नई स्थित आयुध निर्माण कारखान्याच्या ‘हेवी व्हेहिकल फॅक्टरी’ला दिली आहे. यामुळे संरक्षण दलात पुढील काही महिन्यांत अत्याधुनिक अर्जुन एमके-१ ए रणगाडे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ७ हजार ५२३ कोटी रुपये एवढी या ११८ रणगाड्यांची किंमत आहे.
भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार अत्याधुनिक ‘अर्जुन एमके-१ ए’ रणगाडे
बऱ्याच वर्षांच्या संशोधनानंतर डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्वदेशी बनावटीचा अर्जुन रणगाडा (अर्जुन एमके- १) विकसित केला होता. पण यात अनेक बदल संरक्षण दलाने सुचवले. २०१२ पर्यंत लष्करात एकुण १२४ अर्जुन रणगाडे हे दाखल झाले. असे असले तरी बदलत्या काळानुसार आणि संरक्षण दलाची नवी गरज लक्षात घेता अर्जुन रणगाड्यामध्ये आणखी बदल संरक्षण दलाने सुचवले.
तेव्हा आणखी ७२ बदल अर्जुन एमके- १ रणगाड्यात करत अर्जुन रणगाड्याची नवी आवृत्ती ‘अर्जुन एमके-१ ए’ ही डीआरडीओने विकसित केली. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान यांच्या हस्ते पहिला अर्जुन एमके-१ ए रणगाडा लष्कराकडे दिला होता. लष्कराने विविध ठिकाणी सखोल चाचण्यानंतर अर्जुन एमके-१ ए रणगाड्याला स्वीकारले आणि ११८ रणगाड्यांची ऑर्डर दिली.