पुणे – चार दिवसांमध्ये घडलेल्या सहा खुनाच्या घटनांचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे दबंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. खुनाच्या घटना वाढल्या नाहीत, त्या कमीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, भर चौकात जोपर्यंत खून होत नाही, तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होत नाही. या सामाजिक घटना नसल्याचे वक्तव्य पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.
नागरिकांच्या समोर भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकत नाही – कृष्ण प्रकाश
या घटनांबाबत कृष्ण प्रकाश म्हणाले की, खुनाच्या घटना वाढल्या नाहीत, कमीच आहेत. खून व्हायला नाही पाहिजेत, या मताचा मी आहे. पण जोपर्यंत भर चौकात नागरिकांच्या समोर खून होत नाही, तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकत नाही. आत्ता झालेल्या खुनाच्या घटना या सामाजिक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, शहरात कामगार वस्त्या आणि कामगार भरपूर आहेत. अनलॉकनंतर बाहेरील लोक कामासाठी आले. त्या लोकांमध्ये वाद विवाद होतात, यातून अशा घटना घडत असल्यामुळे समाजात भीती बाळगण्याचे कारण नाही. या घटना व्यक्तिशः असल्याचे म्हणत त्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. पुढे ते म्हणाले की, अशा घटना कायद्याच्या भीतीने संपत नाहीत. कायदा अवगत असेल तर भीती असते. रागात नसतो, तेव्हा कायद्याची भीती असते अशी उदाहरणे त्यांनी दिली आहे.