देशात काल दिवसभरात 31,382 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 318 जणांचा मृत्यु


नवी दिल्ली – देशातील कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी जवळपास तीन लाखांवर पोहोचली आहे. त्यात आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 31,382 कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 318 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात 32,542 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 35 लाख 94 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 46 हजार 368 बाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत देशभरातील 3 कोटी 28 लाख 48 हजार नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून जवळपास तीन लाखांवर पोहोचली आहे. तर एकूण 3 लाख 162 रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.

देशातील कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या सध्या केरळात आहे. काल दिवसभरात केरळमध्ये 19,682 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे केरळमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 45 लाख 79 हजार 310 वर पोहोचली आहे. तर केरळमध्ये 152 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतांचा आकडा 24,191 वर पोहोचला आहे. तर 1 लाख 60 हजार 46 रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.