ॲम्ब्युलन्सवरील आताच्या कर्कश सायरनचा आवाज बदलणार, नितीन गडकरींची घोषणा


पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गाड्यांमध्ये सध्या जे हॉर्न आहेत, त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचे सांगितल्यानंतर, आता अॅम्ब्युलन्सच्या सायरन संदर्भात मोठी घोषणा केली. नितीन गडकरींनी पुण्यात आयोजित कार्यक्रमात म्हटले की, आता मी आदेश काढणार आहे की ॲम्ब्युलन्सवर जर्मन संगीतकाराने तयार केलेले संगीत किंवा धुन वापरण्यात यावी. आताचा कर्कश सायरन ॲम्ब्युलन्सवर नको, असे त्यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी सध्या गाड्यांमध्ये जे हॉर्न आहेत, त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचे सांगितले होते. आता तुमच्या गाड्यांमध्ये कर्कश आवाजांच्या हॉर्नच्या जागी मधूर आणि सुरेल आशा भारतीय वाद्यांमध्ये आता तुमच्या गाड्यांचे हॉर्न वाजणार आहेत आणि यासंबंधित लवकरच कायदा करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली होती.

पुण्यात केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. संरक्षण विभागाकडून पुण्यातील विमानतळासाठी जागा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी संरक्षण विभागाकडून चंदीगडच्या आणि पुण्याच्या जागेची अदलाबदल करण्यात येईल. त्याला मंजुरी मिळाली आहे. पुण्यातील नदी प्रकल्पालाही मंजुरी मिळाली आहे. नागपुरप्रमाणे पुण्यातही वाघोली ते शिरुर हा रस्ता पन्नास हजार कोटी खर्च करून बांधण्याचा विचार सुरु आहे. हा रस्ता तीनमजली असेल. दोन मजले उड्डाणपूलाचे तर शेवटचा तिसरा मजला मेट्रोसाठी असेल. यासाठी मदत करण्यास केंद्र तयार आहे, त्यासाठी राज्याने जीएसटी माफ करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, आमचा मुंबई नरिमन पॉईंटला दिल्लीला जोडण्याचा प्रयत्न आहे. यासाठी राज्य सरकार सोबत लवकरच बैठक घेणार आहे. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते सोलापूर, पुणे ते बारामती अशा ज्या ज्या ठिकाणी ब्रॉडगेज रेल्वे आहे, तिथे मेट्रो चालवता येईल. याचे तिकिट रेल्वेच्या तिकीटाएवढे राहील. या मेट्रोला दोन मिलगाडीचे डबे असतील. ज्यामधून दुध, फळे यांची वाहतूक होईल. ही मेट्रो खाजगी व्यवसायिकांना चालविण्यास द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच अजित पवारांनी ठरवले तर ते पुण्याला सर्व प्रकारच्या प्रदूषणातुन मुक्त करु शकतात. पुणे-बंगळुरु एक्स्प्रेस वे चाळीस हजार कोटी खर्च करून बांधणार आहोत. या एक्स्प्रेस वेच्या शेजारी नवीन पुणे वसवावे, असेही ते म्हणाले.

त्याचबरोबर माझ्या कार्यकाळात मला पेट्रोल आणि डिझेल बंद करायचे आहे. राजीव बजाज यांना मी सांगितले की जोपर्यंत तुम्ही इथेनॉलवर चालणारी गाडी तयार करत नाही, तोपर्यंत माझ्याकडे येऊ नका. तशी गाडी देखील त्यांनी तयार केली. मी तीन ते चार महिन्यांत ऑर्डर काढणार आहे की सर्व प्रकारच्या कारसाठी अगदी मर्सिडीज सुद्धा पेट्रोल आणि इथेनॉलवर चालू शकेल अशी इंजिन बसवावी लागतील. दुचाकीही इथेनॉलवर चालवता येतील, असे गडकरी म्हणाले.