राज्य सरकारच्या बहुसदस्यीय प्रभाग निर्णयावर नाना पटोले म्हणतात


नागपुर – आमचे काम जनतेचे म्हणणे मांडणे हेच असल्याचे सांगत राज्य सरकारकडे आपण बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी आपण राज्य सरकारकडे केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना दिली. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला काँग्रेसचा विरोध असून आपण द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीचा विचार करण्यासंदर्भात राज्य सरकारला सुचवल्याचेही पटोले यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने काँग्रेसचा विरोध असताना असा निर्णय का घेतला याविषयी त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले, तीन पक्षांचे सरकार आहे. अनेकांची अनेक मते होऊ शकतात. पण जनतेचे म्हणणे मांडणे आमचे काम आहे. आम्ही, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनाही भूमिका कळवली होती. निर्णय सरकारकडे झालेला असेल पण पुढच्या कॅबिनेटच्या वेळी त्याचा पुनर्विचार व्हावा ही विनंती आम्ही केलेली आहे.

महापालिका निवडणुकीतील बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एकसदस्यीय वॉर्डप्रमाणे निवडणूक घेण्याच्या शासनाच्या यापूर्वीच्या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्याची काँग्रेसची अपेक्षा बळावली होती. पण, राज्य शासनाच्या बुधवारच्या बैठकीत पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग (तीन सदस्य प्रभाग) पद्धतीने निवडणूक घेण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळेच मागील पंधरा वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपसाठी हा निर्णय पथ्यावर पडणारा ठरेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.