टाटा-एअरबससोबत मोदी सरकारचा २० हजार कोटींचा करार


नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने दोन आठवड्यांपूर्वीच टाटा समूह आणि युरोपची एअरबस कंपनी यांच्याकडून भारतीय हवाईदलाची मालवाहतूक विमाने संयुक्तरीत्या बनवून घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानंतर संरक्षण दलाच्या माध्यमातून आज सरकारने या दोन्ही कंपन्यांसोबत २० हजार कोटी रुपयांचा करार निश्चित करुन त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आता टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी याचसंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. टाटांनी या संदर्भात ट्विटरवरुन भाष्य करताना टाटा समुहातील उपकंपनी असणाऱ्या टाटा अॅडव्हान्स सिस्टीमबरोबरच भारतीय संरक्षण दल आणि एअरबसचेही अभिनंदन केले आहे.

सी २९५ विमानांची एअरबस डिफेन्स आणि टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम बांधणी करणार असून भारतामध्ये हवाई क्षेत्रामधील नवीन संधी यासाठी मिळालेल्या मंजूरीमुळे उपलब्ध होणार आहेत. ही संमती म्हणजे या क्षेत्रात नव्याने संधी उपलब्ध करुन देण्यासाठी उचलण्यात आलेले मोठे पाऊल असल्याचे टाटा म्हणाले आहेत.

सी २९५ हे मल्टीरोल म्हणजेच एकाचवेळी अनेक कामे करु शकणारे विमान असून यामध्ये आवश्यकतेनुसार बरेच बदल करण्यात आल्याचेही टाटा म्हणाले आहेत. हे विमान पूर्णपणे भारतामध्येच तयार होणार आहे. तसेच या माध्यमातून घरगुती मागणी आणि पुरवठासंदर्भातील साखळीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जा मिळणार आहे. यापूर्वी असा प्रकल्प कधी हाती घेण्यात आला नसल्याचेही टाटांनी या शुभेच्छा देताना अधोरेखित केले आहे. मेक इन इंडियाला या निर्णयाच्या माध्यमातून चालना मिळेल, असेही रतन टाटा म्हणाले आहेत.