कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या पंतप्रधान मोदींना अमेरिकेत जाण्याची परवानगी मिळाली कशी ? काँग्रेसचा सवाल


नवी दिल्ली – सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधान अमेरिका दौऱ्यादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करणार आहेत. त्यांनी त्याआधी अमेरिका आणि इतर काही देशांच्या राज्यांच्या आणि कंपन्यांच्या प्रमुखांनाही भेट घेतली आहे. पण नरेंद्र मोदींच्या या भेटीवरून आता सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी भारतात तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अद्याप पूर्णपणे मान्यता दिलेली नाही. या लसीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) देखील मान्यता दिलेली नाही.

यामुळे, या कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही हजारो भारतीय परदेशात जाऊ शकत नाही आहेत. पण त्याच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत जाण्याची परवानगी मिळाली कशी? याबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. १ मार्च रोजी नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस एप्रिल महिन्यात मोदींनी घेतला. पंतप्रधानांनी घेतलेल्या कोरोना लसीला अमेरिकेत मान्यता नसल्यामुळे लोक त्यांच्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारत आहेत.


त्यानंतर प्रसिद्ध रिअॅलिटी टीव्ही शो इंडियन आयडॉलचे निर्माता निखिल अल्वा यांनी ट्विट करून नरेंद्र मोदींनी कोणती लस घेतली, असे विचारले होते. त्यानंतर सोशल मिडियावर चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लस मिळाल्यानंतरही अमेरिकेत प्रवेश मिळण्याबाबत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दिग्विजय सिंह म्हणाले की अमेरिकेने ही लस आपल्या यादीत समाविष्ट केलेली नाही. अशा परिस्थितीत, ही लस घेतल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रवेश कसा मिळाला? असा सवाल त्यांनी केला आहे.


मला आठवते त्यानुसार मोदी यांनी ही लस घेतली, जी अमेरिकेने मंजूर केलेली नाही किंवा त्यांनी या व्यतिरिक्त इतर कोणतीही लस घेतली आहे की अमेरिकन प्रशासनाने त्यांना सूट दिली आहे? हे देशाला जाणून घ्यायचे असल्याचे दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्वीट म्हटले आहे. दिग्विजय सिंह व्यतिरिक्त काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांचा मुलगा निखिल अल्वा यांनीही यावर प्रश्न विचारला आहे. त्यानी स्वतः ही कोव्हॅक्सिन लस स्वतः घेतली आहे. पंतप्रधानांप्रमाणे मलाही आत्मनिर्भर कोव्हॅक्सिन मिळाले आहे. आता मी इराण, नेपाळ आणि इतर काही देश वगळता जगाच्या बऱ्याच भागात प्रवास करू शकत नाही. पण मला हे जाणून आश्चर्य वाटले की पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेत जाण्याची परवानगी मिळाली आहे, जे कोव्हॅक्सिनला मान्यता देत नाही. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की त्यांनी प्रत्यक्षात कोणती लस घेतली?, असे निखिल अल्वा यांनी म्हटले आहे.