पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याचे अजित पवारांनी दिले संकेत


पुणे – एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना संपूर्ण देश करत असतानाच दुसरीकडे लसीकरण मोहिम देखील वेगाने राबवण्यात येत असल्यामुळे या संकटावर नियंत्रण मिळण्याचा विश्वास वाढू लागला आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधितांची संख्या देखील आटोक्यात आल्याचे गेल्या काही दिवसांच्या राज्यातील आकडेवारीवरून दिसत आहे. वाढते लसीकरण आणि आटोक्यात असलेली रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर आता पुण्यात निर्बंध अजून शिथिल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील संकेत खुद्द पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

४ ऑक्टोबरला राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील मान्यता मिळाली आहे. त्यानुसार कोरोनामुक्त झालेल्या ग्रामीण भागात ५वी ते १२वी तर शहरी भागात ८वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविषयी अजित पवारांनी यावेळी भूमिका स्पष्ट केली. जरी शाळा ऑनलाईन घेतल्या तरी त्याला खूप मर्यादा येत होत्या. शेवटी शाळेतील वातावरण, मुलांनी एकत्र बसणे हा अनुभव महत्त्वाचा असतो. त्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे ते म्हणाले.

पुणे जिल्हा, शहर आणि पिंपरी चिंचवडमधील सध्याची परिस्थिती बरी आहे. काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत येत्या १ ऑक्टोबरला बैठक होईल. कोरोनाच्या कोणत्या नियमांमध्ये शिथिलता देता येईल याबाबत सगळे आमदार, खासदार, अधिकारी मिळून घेणार आहोत, अशी माहिती यावेळी बोलताना अजित पवार यांनी दिली. दरम्यान, स्विमिंग पूलबाबतच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. आपण खेळाडूंना स्विमिंग पूलबाबत परवानगी दिली होती. आता दोन्ही डोस झालेल्या सामान्य नागरिकांनाही परवानगी देण्यात आली आहे. पण हे सगळे होत असताना ग्रामीण असो वा शहरी भाग असो, मास्क सगळ्यांनी वापरलाच पाहिजे. त्यात तडजोड केली जाणार नाही. हे संकट नियंत्रणात यावे आणि संपून जावे, त्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. तशा सूचना पोलीस आणि वरिष्ठांना देण्यात आल्याचे ते म्हणाले.