जेम्स बॉंड क्रेगला रॉयल नेव्हीचे मानद कमांडर पद

डेनियल क्रेग त्याची पाचवी बॉंड फिल्म ‘नो टाईम टू डाय’ रिलीज होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्याचवेळी त्याला विशेष सन्मान मिळाला आहे. युकेच्या रॉयल नेव्हीमध्ये त्याला मानद कमांडर पद दिले गेले आहे. या प्रतिष्ठित रँकवर नियुक्ती झाल्याबद्दल आपल्या भावना क्रेग याने व्यक्त केल्या आहेत. तो म्हणतो, ‘ मला अतिशय सन्मानित झाल्याची भावना आहे. हा विशेषाधिकारच आहे.’ क्रेगचा नो टाईम टू डाय ३० सप्टेंबरला भारतात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाकडून बॉंड चित्रपट रसिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. जेम्स बॉंडचा प्रत्येक चित्रपट म्हणजे यशाची खात्रीच असते. क्रेगला रॉयल नेव्हीत कमांडर पद दिले गेल्याची घोषणा २३ सप्टेंबर रोजी करण्यात आल्यावर जेम्स बॉन्डच्या ट्विटर अकौंटवर क्रेगचा रॉयल नेव्ही युनिफॉर्म मधील फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यात कॅप्शन मध्ये ‘ क्रेग, रॉयल नेव्ही मानद कमांडर’ असे म्हटले गेले आहे.

१९५३ साली इयान फ्लेमिंग यांनी जेम्स बॉंड ही काल्पनिक गुप्तहेर व्यक्तिरेखा जन्माला घातली आणि आजही बॉंड ची क्रेझ कमी झालेली नाही. हॉलीवूड मध्ये त्यावर अनेक चित्रपट बनले आणि सीन कॉनरी, डेव्हिड निवेन,जॉर्ज लेजेनबी, रॉजर मूर्, टिमोथी डाल्टन, पियर्स अश्या अनेक कलाकारांनी बॉंड साकारला. क्रेगने कॅसिनो रॉयल, क्वांटम ऑफ सोलेस, स्कायफॉल या चित्रपटात बॉंड साकारला आहे.