सणाच्या काळात ई कॉमर्स कंपन्यांची विक्री वाढणार

आगामी सणांच्या काळात ई कॉमर्स कंपन्यांची विक्री गतवर्षीच्या तुलनेत २३ टक्क्यांनी वाढून ९ अब्ज डॉलर्स म्हणजे ६६.४ हजार कोटींवर जाईल असा अंदाज वर्तविला गेला आहे. गतवर्षी ही विक्री ७.४ अब्ज डॉलर्स होती. कन्सल्टिंग फर्म रेडसीरने गुरुवारी सादर केलेल्या अहवालात करोना नंतर ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहक संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. पूर्ण वर्षात ई कॉमर्स कंपन्यांची एकूण ऑनलाईन विक्री ४९ ते ५२ अब्ज डॉलर्सवर जाईल आणि २०२० च्या तुलनेत ती ३७ टक्के जास्त असेल असे म्हटले आहे.

सण काळातील पहिल्या आठवड्यात ऑनलाईन ग्रॉस मर्चेंडाइज व्हॅल्यू वार्षिक आधारावर ३० टक्के वाढून ४.८ अब्ज डॉलर्सवर जाईल असेही यात नमूद केले गेले आहे. विक्रीनंतर परत आलेल्या सामानची किंमत कमी करण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर विकलेल्या उत्पादनाचे एकूण मूल्य म्हणजे ही व्हॅल्यू असते. रेडसिरचे भागीदार मृगांक गुटगुटीया म्हणाले ८० टक्के विक्रेत्यांनी करोना काळात झालेले नुकसान भरून येण्यासाठी यंदाची विक्री महत्वाची भूमिका बजावेल हे मान्य केले आहे.

विशेष म्हणजे यंदा छोटी शहरे आणि निमशहरी भागातील ग्राहक ई कॉमर्स ऑनलाईन खरेदीत महत्वाचे ठरणार आहेत. यंदाच्या उत्सव खरेदीत त्यांचा वाटा ५५ ते ६० टक्के असेल. मोबाईल खरेदीचा वाटा ११ टक्के असेल आणि ईएमआय, बाय नाऊ पे लॅटर असे पर्याय असल्याने विक्री वाढणार आहे.