निरंजनी आखाड्यात उच्चशिक्षित साधूंचा भरणा

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाड्याचे सचिव महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युनंतर देशातील अनेक आखाडे चर्चेत आले आहेत. मान्यताप्राप्त एकूण १३ आखाड्यात निरंजनी आखाडा अनेक अर्थानी वेगळा आहे. या आखाड्यात उच्चशिक्षित साधूंची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे भारताच्या धार्मिक क्षेत्रात अनेक नव्या प्रथा स्थापन करणारा म्हणून त्याकडे पाहिले जाते. हरिद्वार कुंभमेळ्यात करोना साथीमुळे सामील होणार नसल्याची घोषणा याचा आखाड्याने सर्वप्रथम केली होती आणि त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला होता.

श्री पंचायती तपोनिधी निरंजन असे या आखाड्याचे पूर्ण नाव आहे. त्यांचा मुख्य आश्रम मायापुरी येथे असून या आखाड्यात डॉक्टर, इंजिनिअर, अन्य प्रोफेशन शिक्षण घेतलेले अनेक साधू आहेत. शैव परंपरा पाळणाऱ्या या आखाड्यात ७० टक्के साधू उच्चशिक्षित आहेत असे सांगितले जाते. त्यात संस्कृत विद्वान, आचार्य यांचाही समावेश आहे. या आखाड्याची स्थापना सन ९०४ विक्रम संवत ९६०, कार्तिक, कृष्णपक्ष, सोमवारी गुजराथ येथील मांडवी येथे झाली होती. त्याचे मुख्यालय प्रयागराज येथे आहे आणि या आखाड्यात १० हजार नागा संन्यासी आहेत. यात ३३ महामंडलेश्वर आणि महंत व श्रीमहंत यांची संख्या किमान १ हजार आहे.

कुंभ सुरु होताना या आखाड्याने भव्य पेशवाई मिरवणूक काढली होती. त्यात चांदीचे रथ, हत्ती, उंट, यांचा समावेश होता. हा आखाडा सर्वात श्रीमंत आखाडा मानला जातो आणि त्याची देशभर १ हजार कोटींची मालमत्ता आहे. आखाड्याचे महामंडलेश्वर बनण्यासाठी वयाचे, शिक्षणाचे बंधन नसते तर वैराग्य, संन्यास आवश्यक आहे. तसेच कथा प्रवचन देता यावे लागते आणि वेदाभ्यास केलेला असावा लागतो. यासाठी परीक्षा घेतली जाते.

काही वर्षापूर्वी डिस्कोथेक व बारचे संचालन करणाऱ्या रियल इस्टेट व्यावसायिक सचिन दत्ता याना महामंडलेश्वर सच्चिदानंद गिरी असा दर्जा दिल्यामुळे हा आखाडा वादात सापडला होता.