काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांचे निधन


पुणे – वयाच्या ७२ व्या वर्षी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे निधन झाले आहे. रणपिसे यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून एक अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले आहे. पुण्यातील जोशी खासगी रुग्णालयात शरद रणपिसे यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली.

शरद रणपिसे यांच्यावर गेली चार ते पाच दिवस व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. रणपिसे यांच्यावर झालेल्या हर्नियाच्या ऑपरेशननंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. दरम्यान, आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१४ सप्टेंबर १९५१ रोजी पुण्यात आमदार शरद रणपिसे यांचा जन्म झाला होता. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरवात केल्यानंतर त्यांनी थेट विधान परिषद गाठली. पुढे त्यांचा प्रवास विधान परिषद आमदार ते विधिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असा राहिला. विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते म्हणून देखील त्यांनी चांगले काम केले.

१९७९-८५ या कालावधीत रणपिसे हे पुणे महापालिकेचे नगरसेवक, तर त्यानंतर १९८३-८४ ला गलिच्छ वस्ती निर्मूलन, गृहनिर्माण आणि समाज कल्याण समितीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर १९९४-९५ मध्ये ते उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, पुणेचे सदस्य होते.