मोदी सरकारची मोठी घोषणा; देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार डिजिटल हेल्थ कार्ड


नवी दिल्ली – २७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य अभियान योजनेचा शुभारंभ करणार आहेत. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन या नावाखाली पूर्वी ही योजना सुरू होती. प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य अभियान, माहिती आणि पायाभूत सुविधांच्या विस्तृत श्रेणीद्वारे कार्यक्षम, प्रवेशयोग्य, सर्वसमावेशक, परवडणारे आणि सुरक्षित पद्धतीने सार्वत्रिक आरोग्य संरक्षण प्रदान करते, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

आता देशभरात प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन योजना विस्तारित होणार आहे. या अंतर्गत, लोकांची डिजिटल आरोग्य ओळखपत्रे बनवली जातील. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबर रोजी या मिशनची देशव्यापी घोषणा करतील, असे त्यांनी सांगितले. या हेल्थ आयडीमध्ये व्यक्तीचा संपूर्ण वैद्यकीय माहिती असणार आहे.

लोकांना अनेकदा त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी किंवा उपचारासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते. कधीकधी सर्व आरोग्य अहवाल घेऊन जाणे शक्य नसते किंवा कधी काही अहवाल गहाळ होण्याची शक्यता असते. या डिजिटल आरोग्य ओळखपत्रात आता संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्याचा तपशील असणार. म्हणजेच, त्याला कोणता आजार होता, उपचार कोठे केले गेले आणि कोणत्या डॉक्टरांनी केले. उपचार, औषधे वगैरे सगळ्याचा परिणाम काय झाला ही सर्व माहिती ओळखपाद्वारे मिळणार आहे. यासह, रुग्णाच्या आजाराबाबत समजून घेण्यासाठी दुसऱ्या डॉक्टरला सुरुवातीपासूनच जाणून घेण्याची गरज भासणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी आरोग्य ओळखपत्राची घोषणा केली. आरोग्य ओळखपत्र हे देशातील आरोग्य क्षेत्रातील एक अतिशय क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे. हे आरोग्य ओळखपत्र प्रथम ६ केंद्रशासित प्रदेशांमध्ये (अंदमान आणि निकोबार, चंदीगड, लडाख, लक्षद्वीप, पुदुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमन दीव) सुरू करण्यात आले. आता ते देशभरात लागू केले जात आहे.