काल दिवसभरात देशात 31,923 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 282 रुग्णांचा मृत्यू


मुंबई – देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मागील काही दिवसांपासून चढ-उतार कायम आहे. देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा काहीशी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 31,923 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 282 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच 24 तासांत 31,990 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 35 लाख 63 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 46 हजार 50 बाधितांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 28 लाख 15 हजार नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांच्या आसपास आहे. सध्या 3 लाख 1 हजार 640 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत मागील काही दिवसांपासून चढ-उतार कायमच आहे. काल (बुधवार) राज्यात 3,608 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 285 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 63 लाख 49 हजार 029 बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.21 टक्के आहे. तर काल (बुधवार) राज्यात 48 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11, 344 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 39 हजार 984 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,64,416 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,678 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

काल दिवसभरात आर्थिक राजधानी मुंबईत 488 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 359 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,16,1116 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत काल दिवसभरात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4706 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1187 दिवसांवर गेला आहे.