पाकव्याप्त काश्मीर मध्ये चीन पसरतोय पाय

पाकिस्तानला मदत करण्याच्या नावाखाली चीन पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचीस्थान मध्ये पाय पसरू लागल्याने भारत अधिक सावध झाला आहे. चीन पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करत आहे आणि आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या नावाखाली चीनी नागरिकांना पाकिस्तान मध्ये पाठवत आहे. येत्या चार वर्षात म्हणजे २०२४ पर्यंत मदतीच्या नावाखाली किमान ५० लाख चीनी पाकिस्तान मध्ये येतील असे संकेत मिळाले आहेत. पाकिस्तान आरोग्य सेवा अकादमीचे प्रमुख प्रो. डॉ. शहजाद अली खान यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

पाकिस्तान आणि चीन मध्ये हेल्थ कॉरीडॉर निर्माण केला जात असून त्यामुळे दोन्ही देशात वैद्यकीय विश्वविद्यालये आणि संशोधन संस्थात सहयोग वाढणार आहे असे डॉ.शहजाद यांनी सांगितले आहे. ते म्हणाले आधुनिक वैद्यकाबरोबर पारंपारिक चीनी उपचार या अंतर्गत केले जाणार आहेत. चीनने अगोदरच पाकिस्तान मध्ये अज्बावधी डॉलर्सचे प्रकल्प सुरु केले आहेत.

परराष्ट्र नीती तज्ञांच्या मते पाकिस्तानला मदतीच्या बहाण्याने चीन पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान मध्ये पाय रोवत आहे. पाकिस्तान सरकारवर पकड मिळविण्याचा प्रयत्न चीन कडून सुरु आहे. चीनने मोठी गुंतवणूक केलेल्या एका प्रकल्पाचा हिस्सा पीओके आणि बलुचिस्तानात आहे. त्या संदर्भात भारताने वेळोवेळी आक्षेप नोंदविले आहेत तर बलुचिस्तान मध्ये चीनी इंजिनिअर्सवर हल्ले केले जात आहेत. एप्रिल मध्ये एका हॉटेलवर झालेल्या कारस्फोट वेळी चीनी राजदूत त्या हॉटेल मध्ये होते. जुलै मध्ये धरणावर काम करणाऱ्या चीनी कर्मचाऱ्यांना हल्ला करून ठार केले गेले होते.