साधू आखाड्यांकडे कुठून येतो इतका पैसा?

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाडा प्रमुख महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर या आखाड्यांची संपत्ती आणि विवाद चर्चेत आले आहेत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत मंदिरे, आखाडे, मठ यांच्याकडे इतकी प्रचंड संपत्ती येते कुठून असा प्रश्न अनेकांना पडला आहे. धर्माशी जोडलेल्या या संस्थांना देणग्या, दाने, बक्षिसी मोठ्या प्रमाणावर मिळतात. नरेंद्रगिरी वाघंबरी मठ आणि निरंजनी आखाडा प्रमुख होते आणि या आखाड्याच्या देश विदेशात प्रचंड मालमत्ता आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आखाडे, मठ, मंदिरे याना आयकर भरावा लागतो. आयकर विभाग त्या संदर्भात नोटीसा सुद्धा देतात. अनेक आखाडे, मंदिरांचे संचालन सुद्धा करतात. मोठ्या मंदिरांना, देवस्थानांना भाविकांकडून दान, देणग्या प्रचंड प्रमाणात मिळतात. काही भाविक जमिनी, पैसा,घरे दान देतात. देशात १३ मान्यताप्राप्त आखाडे असून शेकडो वर्षांपूर्वी त्यांची स्थापना जगदगुरु शंकराचार्य यांनी केली होती. तेव्हापासून कुंभ अथवा अन्य मोठ्या धार्मिक समारंभात राज्य सरकार कडून सुद्धा या आखाड्याना आर्थिक मदत दिली जाते आहे.

मंदिरातून मिळणारी दाने, गोशाला, वैदीक शाळा, भाड्याने दिलेल्या जागा यातून सुद्धा आखाड्याना उत्पन्न मिळते. पूर्वी राजे महाराजे, शेठ त्यांना जमिनी दान देत असत. या उत्पन्नातून धार्मिक कार्यक्रम खर्च, कुंभ मेळ्यात मांडव, रथ, घोडे, पालख्या यांचा खर्च, संपत्ती देखभाल खर्च, कर्मचाऱ्यांचा खर्च, संत महंतांच्या देश विदेशातील प्रवासाचा खर्च केला जातो. अर्थात कमाई आणि खर्च याचे विवरण आयकर विभागाला सादर करावे लागते आणि सोसायटी अॅक्टखाली या आखाड्याची नोंदणी केल्यावर १२ ए आयकर नियमानुसार त्यांना आयकरात काही सवलती मिळतात.

नरेंद्र गिरी ज्या आखाड्याचे प्रमुख होते तो निरंजनी आखाडा या सर्व आखाड्यातील सर्वात श्रीमंत मानला जातो. फक्त प्रयागराज मध्ये मठ, मंदिरे, जमिनी मिळून ३०० कोटीची मालमत्ता असून हरिद्वार, नाशिक, उज्जैन, मिर्झापूर, माउंट अबू, जयपूर, वाराणसी, नॉयडा, बडोदा येथे त्यांचे मठ, आश्रम आहेत. त्यांची किंमत १ हजार कोटींच्या घरात आहे असे समजते.