कर्मचाऱ्यांना पगारवाढ देता यावी म्हणून घर विकणारा दिलदार बॉस
अमेरिकेतील एका दिलदार बॉसची कहाणी सध्या वेगाने व्हायरल झाली आहे. ग्रॅव्हीटी पेमेंटस या क्रेडीट कार्ड प्रोसेसिंग कंपनीचा सीईओ डॅन प्राईस असे या बॉसचे नाव आहे.
डॅनला एक दिवस असे समजले की घरखर्च भागविण्यासाठी त्याच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना चोरी छिपे दुसरी नोकरी करावी लागते आहे. तेव्हा त्याने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याने स्टाफचा पगार किमान ५१ लाख केला. ३१ वर्षीय डॅनचा हा निर्णय ऐकताच त्याचे दिवाळे निघणार, कंपनी जास्त दिवस चालणार नाही असे अंदाज वर्तविले गेले. पण प्रत्यक्षात मात्र डॅनला या निर्णयाचा फायदा झालाच पण स्टाफ सुद्धा खुश झाला आणि मन लावून काम करू लागला.
डॅनने स्टाफला पगार वाढवून देता यावा म्हणून स्वतःचा पगार ७ कोटींनी कमी करून ५१ लाखावर आणलाच पण तेव्हड्याने भागेना तेव्हा त्याने त्याचे दुसरे घर विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशातून स्टाफचा पगार ५१ लाखांवर नेला. गेल्या ६ वर्षात कंपनीचा फायदा वाढला असून टर्न ओव्हर वाढला आहे. कंपनी स्टाफची संख्या दुपटीने वाढली आहे आणि कोणीही कर्मचारी कंपनी सोडायला तयार नाही.
द सनच्या रिपोर्ट नुसार डॅनने २०२० करोना काळात नुकसान सोसावे लागल्याचे मान्य केले आहे पण त्यातून कंपनी बाहेर पडली असल्याचे स्पष्ट केले आहे. तो म्हणतो, करोना काळात स्टाफने स्वेच्छेने कमी पगार घेतला आणि आता आम्ही पुन्हा एकदा वेगाने वाटचाल करत आहोत.