अमेरिकेत पोहोचले मोदी, नारे देऊन झाले स्वागत
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या दौऱ्यावर अमेरिकेत पोहोचले आहेत. वॉशिंग्टन डीसीच्या जॉईन्ट बेस अँड्र्यूजवर मोदींचे विमान उतरले तेव्हा हलक्या पावसात सुद्धा अनेक भारतीय हातात तिरंगा घेऊन त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. मोदी विमानातून उतरताच ‘मोदी मोदी’ घोषणांच्या निनादात मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले गेले.
मोदींच्या सन्मानार्थ जॉईन्ट बेस अँड्र्यूजवर तिरंगा फडकाविला गेला होता. मोदींनी जमलेल्या भारतीयांच्या अभिवादनाचा स्वीकार करताना अनेकांशी हस्तांदोलन केले. मोदींनी या संदर्भात ट्विट करून स्वागताबद्दल आभार व्यक्त केले आणि विदेशात वसलेला भारतीय समाज आमची ताकद आहे, भारतीय वंशाने जगभरात स्वतःला प्रतिष्ठित बनविले त्याचे कौतुक वाटते असे लिहिले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरून मोदी अमेरिकेला गेले असून प्रथम ते क्वाड लीडर्स संमेलनात सहभागी होणार आहेत आणि द्विपक्षीय बैठकांत सामील होणार आहेत. त्यानंतर ते न्युयॉर्कला रवाना होतील आणि तेथे संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्रात सहभागी होऊन भाषण देणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यानंतर बायडेन आणि मोदी यांची पहिलीच आमनेसामने भेट होत असून कोविड १९ महामारी मधला मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.