बंद झालेल्या २१ सहकारी बँकांच्या ठेवीदारांना आता दिले जाणार ५ लाख रुपयांपर्यंतचे डिपॉझिट इन्शूरन्स कव्हर


नवी दिल्ली – बँकिंग क्षेत्राशी निगडीत मोठी माहिती समोर येत आहे. आता डिपॉझिट इन्शूरन्स आणि पत हमी महामंडळाकडून (डीआयसीजीसी) पीएमसी बँकेसह २१ अयशस्वी सहकारी बँकांच्या ठेवीदारांना ५ लाख रुपयांपर्यंतचे डिपॉझिट इन्शूरन्स कव्हर दिले जाईल. ४५ दिवसांच्या आत कपोल सहकारी बँक, रुपया सहकारी बँक आणि इतर अनेक सहकारी बँकांना ठेवीदारांचे दावे जमा करण्यास सांगितले आहे.

डीआयसीजीसी संशोधन अधिनियम, २०२१ डीआयसीजीसी अधिनियम १९६१ अंतर्गत विमाधारक बँकांसाठी १ सप्टेंबर २०२१ पासून लागू झाला. त्यानुसार, विमाधारक बँकांच्या ठेवीदारांना ९० दिवसांच्या आत ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम डीआयसीजीसी परत देईल. एका निवेदनात डीआयसीजीसीने म्हटले आहे की, ठेवीदारांकडून ठेवी विम्याचा दावा करण्यासाठी प्राप्त झालेले अर्ज ४५ दिवसांच्या आत सादर करण्याच्या आवश्यक सूचना या बँकांना देण्यात आल्या आहेत. पुढील ४५ दिवसांच्या आत बँकांनी दिलेली यादी डीआयसीजीसीद्वारे पडताळणी आणि सेटलमेंट केली जाईल.

१५ ऑक्टोबरपर्यंत नवीन क्लेम सादर करण्यास आणि २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुद्दल रक्कम आणि व्याजासह स्थिती अपडेट करण्यासबँकांना सांगितले आहे. ठेवीदारांना सल्ला देत डीआयसीजीसीने म्हटले आहे की, ठेवीदार आपल्या बँकांशी संपर्क साधू शकतात आणि दावे सादर करू शकतात. तसेच बँकेला आवश्यक असल्यास इतर आवश्यक कागदपत्रे/माहिती अपडेट करू शकतात. जेणेकरून त्यांच्या दाव्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत बँकेद्वारे प्रक्रिया केली जाईल.

आरबीआयने बँकांवर स्थगिती लागू केल्याच्या ९० दिवसांच्या आत खातेधारकांना ५ लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळावी, यासाठी गेल्या महिन्यात डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (सुधारणा) विधेयक, २०२१ ला मंजुरी देण्यात आली. सरकारने गेल्या वर्षी ठेवींवरील विमा कव्हर पाच पटीने वाढवून ५ लाख रुपये केले होते.

या बँकांच्या ठेवीदारांना मिळणार डिपॉझिट इन्शूरन्स कव्हर – अदूर सहकारी नागरी बँक (केरळ), बिदर महिला अर्बन कोऑप. बँक (कर्नाटक), सिटी सहकारी बँक (महाराष्ट्र), हिंदू सहकारी बँक, पठाणकोट (पंजाब), कपोल सहकारी बँक (महाराष्ट्र), मराठा सहकारी बँक (महाराष्ट्र), मिलठ सहकारी बँक (कर्नाटक), नीड्स ऑफ लाईफ कोऑपरेटिव्ह बँक (महाराष्ट्र), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (महाराष्ट्र), पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक , कानपूर (उत्तर प्रदेश), पीएमसी बँक (महाराष्ट्र), रुपे सहकारी बँक (महाराष्ट्र), श्री आनंद सहकारी. बँक, पुणे (महाराष्ट्र), सीकर अर्बन कोऑप. बँक (राजस्थान), श्री गुरुराघवेंद्र सहकारी बँक (कर्नाटक), द मुधोल सहकारी बँक (कर्नाटक), मंठा नागरी सहकारी बँक (कर्नाटक), सर्जेरादादा नाईक शिराळा सहकारी बँक (महाराष्ट्र), इंडिपेन्डन्स सहकारी बँक, नाशिक (महाराष्ट्र), डेक्कन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, विजयपूर (कर्नाटक), गढ़ा सहकारी बँक, गुना (मध्य प्रदेश).