राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावरुन चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!


मुंबई – भाजपने साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणी केल्यानंतर राज्य सरकारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तसे निर्देश दिल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्राद्वारे उत्तर दिले आहे. पण, आता यावरून मुख्यमंत्र्यांना भाजपकडून लक्ष्य केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या पत्रावरून भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

रोजच्या महिला अत्याचाराच्या घटना पाहाता करोनाच्या तिसऱ्या लाटेऐवजी राज्यात महिला अत्याचाराची तिसरी लाट येते की काय, अशी स्थिती राज्यात येऊ लागली आहे. भाजपकडून राज्यपालांकडे यासंदर्भात विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले पत्र म्हणजे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ भाजपच्या पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

राज्यातील एक महिला म्हणून मी अत्यंत व्यथित आहे. हे कुठल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे पत्र वाटतच नाही. मुख्यमंत्री म्हणताना स्वत:ला कुटुंबप्रमुख म्हणवून घेतात. पण या कुटुंबप्रमुखाला हे माहिती आहे का की आपल्या नाकाखाली या महाराष्ट्रात काय घडत आहे. या अशा बलात्काराच्या, महिला अत्याचाराच्या घटना रोज घडत आहेत. मग त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली, तर त्यात गैर काय? तुमच्या राज्याच्या डीजींना बोलवा आणि या काळात राज्यात किती महिलांचे अपहरण झाले त्याची माहिती घ्या, असे चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून तीव्र शब्दांत टीका केली आहे. एवढ्या घटना घडत असताना सर्वज्ञानी म्हणतात, असे काय घडले आहे अधिवेशन घ्यायला? तुमच्या तोंडाचा फेस निघतो हे सांगताना की ५ वर्ष आमच्या सरकारला धोका नाही. याच्यापलीकडे तुम्ही बोलता काय? तुम्ही राज्यपालांना विरोधकांची थोबाडे फोडायला सांगता. सरकारचे थोबाड फोडा, आहे का तुमच्यात हिंमत. एवढ्या घटना होत असताना हे सरकार षंढासारखं बसले असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.