Big Deal : झी एन्टरटेनमेन्ट आणि सोनी पिक्चर्सचे विलीनीकरण; पुनित गोयंका नवे सीईओ


मुंबई : सोनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत विलीनीकरणाचा झी एन्टरटेनमेन्ट बोर्डाने निर्णय घेतला आहे. या दोन कंपन्यांमध्ये झालेला हा करार तब्बल 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनाता 11 हजार 615 कोटी रुपयांचा असून यामध्ये मेजॉरिटी शेअर्स (52.93 टक्के) सोनी पिक्चर्सकडे असणार आहेत. या दोन कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी पुनित गोयंका हे एमडी आणि सीईओ असतील.

या कराराला झी एन्टरटेनमेन्टच्या झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये मान्यता देण्यात आल्यामुळे आता झी एन्टरटेनमेन्ट आणि सोनी इंडियाच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर आता सोनी इंडियाचे प्रमोटरदेखील कंपनीमध्ये गुंतवणूक करु शकणार आहेत. या विलीनीकरणानंतर सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे मेजॉरिटी म्हणजे 52.93 टक्के शेअर्स तर झी एन्टरटेनमेन्टकडे 47.07 टक्के शेअर्स असणार आहेत.

सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे या विलीनीकरण झालेल्या कंपनीचे मेजॉरिटी डायरेक्टर्स नियुक्त करण्याचे अधिकार असतील. या विलीनीकरणाच्या करारानुसार आता झी एन्टरटेनमेन्ट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क या दोन्ही कंपन्यांना आपल्या-आपल्या लायनर नेटवर्क, डिजिटल अॅसेट्स, प्रोडक्शन व्यवहार आणि प्राईम लायब्ररी एकत्रित करावी लागणार आहेत.

प्रमोटर्स कंपन्यांना या करारानुसार या कंपनीमधील आपला सध्याचा 4 टक्क्यांचा हिस्सा हा वाढवून 20 टक्क्यांवर नेण्याचे स्वातंत्र्य असेल. दोन्ही कंपन्यांना या विलीनीकरणाचा निश्चितपणे फायदा होणार असल्याचे मत बोर्डाने व्यक्त केले आहे. या दोन्ही मोठ्या कंपन्या एकत्रित आल्यामुळे एक नवीन उर्जा मिळेल आणि शेअर होल्डर्सना त्याचा लाभ होईल, असेही बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले आहे.