गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्पात बाधा आणणाऱ्या नक्षलवादी कारवायांना जशास तसे उत्तर द्या – एकनाथ शिंदे


मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पात बाधा ठरणाऱ्या नक्षलवादी कारवायांना जशास तसे उत्तर देण्याचे निर्देश नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षकांना हे आदेश दिले. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या जवळील एका 50 वर्षीय व्यक्तीची नुकतीच हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी लिहून सुरजागड प्रकल्प त्वरित थांबवण्याचा इशारा दिला होता. या घटनेनंतर पालकमंत्री शिंदे यांनी तातडीने बैठक घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. सदर मृत व्यक्तीचा सुरजागड प्रकल्पाशी कोणताही संबंध नसल्याचे यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

सुरजागड लोहखनिज प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून तो कार्यान्वित करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबवताना त्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यास जशास तसे उत्तर देण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच नक्षली कारवाया रोखण्यासाठी जिल्ह्यातील रस्ते आणि दळणवळण वेगाने सुधारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यासाठी या भागातील रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यासोबतच हा प्रकल्प उभा करताना कंपनीतर्फे स्थानिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, प्रशिक्षण केंद्र यांचे काम नीट सुरू आहे अथवा नाही याबाबत आढावा घ्यावा आशा सूचना त्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. तसेच सुरजागड आउटपोस्टच्या कामाचा आढावा घेतला. पोलिसांनी गस्त घालताना पुरेशी काळजी घ्यावी अशी महत्त्वपूर्ण सूचनाही केली.

पोलिसांची या भागात पूर्ण गस्त असून नक्षलवाद्यांच्या प्रत्येक बारीकसारीक हालचालीवर लक्ष असल्याचे यावेळी गडचिरोली पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. सुरजागड हा छत्तीसगड मधून महाराष्ट्रात येण्याचा नक्षलवाद्यांचा पारंपरिक मार्ग असला, तरीही तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला जेरबंद करा
गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिले. यासाठी ‘वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेची मदत घेण्याचे निर्देश श्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाने केलेल्या हल्ल्यात 17 नागरिकांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाकडून या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही हा वाघ सापडला नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.

‘वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ च्या चमूत पशु वैद्यकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, बायोलॉजिस्ट अशा तज्ञ व्यक्तींचा समावेश असून त्यांच्या माध्यमातून या वाघाचा शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेऊन भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दीर्घकालीन उपाय करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य वन संरक्षक अधिकारी मानकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.