सिंधू – दीपिका पदुकोणचे बॅडमिंटन फोटो चर्चेत
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि भारताची बॅडमिंटन ऑलिम्पिक खेळाडू पीव्ही सिंधू या दोघींची जोडी गेले काही दिवस सतत एकत्र दिसते आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर सिंधू आणि ती बॅडमिंटन खेळत असल्याचे काही फोटो शेअर केले असून त्यामुळे वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. फुलराणी सायना नेहवाल नंतर पीव्ही सिंधू हिच्यावर सुद्धा लवकरच बायोपिक तयार होईल आणि त्यात सिंधूची भूमिका दीपिका करणार असल्याची ही चर्चा आहे. अर्थात या दोघींपैकी कुणीच त्या संदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही.
दीपिकाने हे फोटो शेअर करताना खाली कॅप्शन मध्ये, ‘माझ्या आयुष्यातील एक नियमित दिवस. सिंधू सह कॅलरीज बर्न करते आहे’ असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका, रणवीरसिंग आणि पीव्ही सिंधू डिनर साठी जात असताना स्पॉट केले गेले होते आणि तेही फोटो, व्हिडीओ वेगाने व्हायरल झाले होते. तेव्हापासूनच सिंधूवर बायोपिक बनणार आणि दीपिका तिची भूमिका करणार याची चर्चा सुरु झाली आहे.