जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे तिथे समस्या वेगवेगळ्या कारणांमुळे निर्माण झाल्या; मोहन भागवत यांचे वक्तव्य


उदयपूर – जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या वेगवेगळ्या कारणांमुळे कमी झाली आहे, तिथे तिथे समस्या निर्माण झाल्या असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. संघ हा याच कारणामुळे सर्वव्यापी होऊन जागतिक कल्याणाबद्दल चर्चा करणार असल्याचे भागवत म्हणाले आहेत. जगाचे कल्याण हिंदू राष्ट्राच्या परम वैभवामुळे होईल, असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी कोरोना कालावधीमध्ये केलेली निःस्वार्थ सेवा म्हणजेच हिंदूत्व असल्याचे भागवत यांनी यावेळी हिंदूत्वाची व्याख्या सांगताना म्हटले. सर्वांच्या कल्याणाची भावना अशा कामांमध्ये असते. हिंदूंची लोकसंख्या कमी झालेल्या ठिकाणी समस्या निर्माण झाल्याच्या भागवत यांच्या वक्तव्यावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

राजस्थान येथील उदयपुरमधील विद्या निकेतन सेक्टर ४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये मोहन भागवत यांनी संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार यांच्या विचारांबद्दल भाष्य केले. हिंदू सामाजाला एकत्र आणल्यास भारताच्या सर्व समस्यांवर समाधान मिळवता येऊ शकते, असे हेगडेवार यांनी म्हटल्याची आठवण भागवत यांनी करुन दिली. भारतमातेची आपण सर्वजण लेकरे आहोत. सनातन संस्कृतीला मानणारे हे हिंदू आहेत. सनातन संस्कृतीच्या विचारसणीमधील संस्कार हे संपूर्ण विश्वाचा विचार करण्याची शिकवण देतात. शांती आणि सत्य या दोन गोष्टींचा हिंदूंच्या विचारसरणीमध्ये समावेश आहे. आपण हिंदू नाहीत, अशा प्रकारची एक मोहीम देश आणि समाजाला कमकूवत बनवण्याच्या उद्देशाने राबवली जात असल्याची टीका भागवत यांनी केली आहे.

भारतामधील विविधतेच्या तळाची एकतेचेचा भाव असल्याचे संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार यांनी ओळखले असल्याचेही भागवत यावेळी म्हणाले. या पुण्यवान प्रदेशामध्ये अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या पूर्वजांचे आपण वंशज असून सर्वचजण हिंदू आहोत. हाच हिंदुत्वाचा भाव असल्याचे सांगताना भागवत यांनी हेगडेवार यांच्या कार्याची माहितीही दिली. हेगडेवार यांनी आपल्या खासगी स्वार्थाची आहुती देत भारतासाठी काम करण्याचा मार्ग स्वत:च्या इच्छेने निवडला. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पुन्हा इतरांवर अवलंबून राहता कामा नये, यासाठी काम करण्याची गरज हेगडेवार यांनी ओळखली. याच चिंतनामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाल्याचे भागवत म्हणाले.

जागतिक बंधूभाव जपण्याच्या भावनेने संघ हा काम करतो. संपूर्ण विश्व हे संघासाठी समान आहे. संघाला लोकप्रियतेची हाव नाही. तसेच संघाला श्रेयवाद, लोकप्रियता नको. हिंदू शब्द हा ८० च्या दहशकापर्यंत सार्वजनिकपणे बोलायलाही टाळले जायचे. अशा परिस्थितीमध्ये संघाने प्रवाहाविरोधात जात काम केले. सुरुवातीच्या काळामध्ये साधनांची कमतरता असतानाही संघ काम करत राहिला आणि आज संघ जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखला जातो, असे भागवत यांनी संघाचा प्रवास सांगताना म्हटले.

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमचे असीम वकार यांनी भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मोहन भागवत यांनी पूर्ण विचार करुन अशी वक्तव्य करावीत असे म्हटले आहे. मुस्लीम अल्पसंख्यांक ज्या ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी फार अत्याचार झाल्याचे पहायला मिळते, मग ते गुजरात असो किंवा महाराष्ट्र. आपल्या शेजारी असणारे दोहा, कतार, दुबई असो किंवा ओमान असो कुठेच हिंदूंवर मुस्लीम अत्याचार करताना दिसत नाही. पण भारतात गुजरातबरोबरच अनेक ठिकाणी अत्याचाराची हद्द झाल्यामुळे भागवत यांनी आपल्या वक्तव्याचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे.

तर दुसरीकडे संघ प्रमुखांनी संघाची पारंपारिक विचारसणी लक्षात घेत हे वक्तव्य केल्याचे समाजवादी पक्षाचे नेते राकेश सिन्हा यांनी म्हटले आहे. धार्मिक उन्माद भागवत यांना निर्माण करायचा आहे. त्यांना लोकांचे लक्ष मुख्य मुद्द्यांवरुन दुसरीकडे वळवायचे आहे. के. सी. त्यागी यांनी ज्या ठिकाणी आता मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे, त्या लक्षद्वीप आणि काश्मीरमध्ये सध्या कोणतीही समस्या नसल्याचे म्हटले आहे.