अनंत गीतेंच्या त्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर


मुंबई – माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असे सांगत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली आहे. यानिमित्ताने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खास करुन अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा रायगडमधील जुना वाद, राजकीय वैर पुन्हा एकदा डोके वर काढू लागल्याचे दिसत आहे. आता सुनील तटकरे यांनी गीते यांच्या या वक्तव्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, भाजपच्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेंचा स्वाभिमान त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये करण्यात आली, तेव्हा तो गळून पडला होता. गीते यांची राजकीय अवस्था अलीकडच्या काळात सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली असल्यामुळे अशा भावनेतून त्यांचे हे वैफल्यग्रस्त उद्गार आले असल्याचे मला जाणवत आहे. म्हणून ते बोलल्यामुळे काही फरक पडत नाही. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, आघाडीचे जनक आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकारला देशपातळीवर नावाजले जात आहे. त्यामुळे अडगळीत पडलेल्या लोकांना त्या गोष्टीचे भान राहिले नसेल. म्हणून त्या नैराश्यापोटी आलेली ती वक्तव्ये असू शकतील.