गांधी जयंतीला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार कन्हैया कुमार


पटना – 2 ऑक्टोबर रोजी म्हणजे गांधी जयंतीला कम्युनिस्ट नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचदिवशी गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानीही काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कन्हैया यापूर्वी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त 28 सप्टेंबरला पक्षात सामील होणार असल्याची बातमी होती, पण ती तारीख आता पुढे नेण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी दोन वेळा राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. प्रशांत किशोर हे दोन्ही बैठकीदरम्यान उपस्थित होते.

बिहार काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते असितनाथ तिवारी उघडपणे बोलत नाहीत, पण ते निश्चितपणे सांगत आहेत की 2 ऑक्टोबर रोजी सर्व गांधीवाद्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत आहे. जर कन्हैया कुमार सामील झाला, तर त्याचे स्वागत आहे. सीपीआय मुख्यालयातील कार्यालय कन्हैयाने सोडल्यावर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीनंतरच सीपीआयमध्ये कन्हैयाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. हैदराबाद येथे झालेल्या सीपीआयच्या बैठकीतही त्यांच्याविरोधात अनुशासनाचा ठपका ठेवण्यात आला होता.