मंत्री सुनील केदारांचे पक्षाच्या आढावा बैठकीत वादग्रस्त वक्तव्य


नागपूर : राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसचा कितीही मोठा नेता असला, तरी पक्षाशी बेईमानी करत असेल, तर त्याला गाडीतून उतरवून लाथा घाला, असे वक्तव्य सुनील केदार यांनी केले आहे. नागपूरमध्ये जिल्हा परिषद पोटनिवडणूक आणि बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडत असून याच पार्श्वभूमीवर सुनील केदार यांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना गद्दारांना धडा शिकवण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात सुनील केदार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

पक्षाचा कितीही मोठा नेता असला, तरी तो काँग्रेस पक्षाशी बेईमानी करत असेल, तर त्याला गाडीतून उतरवा आणि दोन लाथा धाला, तुमच्यावर पोलीस केस झाली तर मी पाहून घेईन, अशा शब्दात राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेस पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याचा आदेशच कार्यकर्त्यांना दिला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका तसेच जिल्ह्यातील काही बाजार समित्यांच्या निवडणुका होत असतानाच पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षाच्या आढावा बैठकीत पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार मैदानात असताना, जर कोणी नेता कोणीतरी मोठा नेता पाठीशी आहे, असे समजून मी निवडणुकीत वाट्टेल ते करेन, असे वागत असेल, तर त्याला दोन लावा, नंतर मला फोन करा, मी पण मंत्रिपद बाजूला ठेवून, जिथे असेन तसा तिथे येईन असेही ते कार्यकर्त्यांना म्हणाले.