अनंत गीते यांचे महाविकास आघाडीबाबतचे वक्तव्य योग्यच – नाना पटोले


मुंबई – श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये या वक्तव्यानंतर थोड्याफार प्रमाणात धुसफूस पाहायला मिळत आहे. यावरून राज्यात जरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मतभेद बाजूला ठेवत एकत्र जरी आले असले, तरी स्थानिक पातळीवर या पक्षातील नेते, कार्यकर्ते नाखुष असल्याचेच दिसत आहे. दरम्यान, अनंत गीते यांचे महाविकास आघाडीबाबतचे वक्तव्य योग्यच असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काही चुकीचे अनंत गीतेंनी म्हटलेले नाही. अनंत गीतेंनी हेच म्हटले आहे की शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊ शकत नाही. यात चुकीचे काही नाही. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार महाविकास आघाडी ही तयार झाली आहे. हे बरोबरच आहे. अनंत गीते काय चुकीचे बोलले नाहीत, असे नाना पटोलेंनी म्हटले आहे.

जी भावना अनंत गीतेंची आहे त्याबद्दल विचारले असता नाना पटोलेंनी भाष्य केले आहे. शिवसेना आणि काँग्रेस एका विपरित परिस्थितीमध्ये एकत्र आलेली आहे. सोनिया गांधींनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येत असल्याचे सांगितल्याचे नाना पटोलेंनी म्हटले. तर शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्या शरद पवारांवरील वक्तव्यावर आम्ही कोणतेही भाष्य करणार नसल्याचे नाना पटोले म्हणाले.