तालिबानी राज्यात आयपीएल प्रसारणावर बंदी

अफगाणिस्थानचा कब्जा घेऊन सरकार स्थापन केल्यावर तालिबानने आयपीएल २०२१ च्या प्रसारणावर देशात बंदी घातली आहे. तालिबानी शासन आल्यावर त्यांचे नियम आणि कायदे देशात लागू झाले आहेत. आयपीएल मध्ये गैर इस्लामी प्रकार असल्याचे कारण या बंदीमागे दिले गेले आहे. आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा युएई मध्ये रविवार पासून खेळला जात आहे. जगातील लोकप्रिय अश्या या टी २० लीग मध्ये जगभरातील नामवंत क्रिकेटपटू खेळत असतात. या स्पर्धेत अफगाणी खेळाडू सुद्धा सामील आहेत मात्र अफगाणी नागरिक आपल्या देशाच्या खेळाडूंचा खेळ पाहू शकत नाहीत.

तालिबान प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार आयपीएल सामन्यात चिअर गर्ल्स नाच करतात आणि स्टेडियम मध्ये मस्तक न झाकलेल्या महिला येतात हे इस्लाम विरोधी आहे. त्यामुळे या सामन्यांचे प्रक्षेपण करून आम्हाला देशाला चुकीचा संदेश द्यायचा नाही. या स्पर्धेत अफगाणिस्थानचे रशीद खान आणि मोहम्मद नबी खेळत आहेत.

तालिबानने अफगाणिस्थानवर कब्जा केला तेव्हा हे दोघेही देशाबाहेर स्पर्धेत खेळत होते. तालिबानने पुरुषांच्या क्रिकेटला विरोध केलेला नाही. पूर्वी सुद्धा अफगाणी पुरुष क्रिकेट खेळत होते आणि यापुढेही खेळतील असे तालिबानने जाहीर केले  आहे पण इस्लाम विरोधी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.