रशियन सार्वत्रिक निवडणूक, पुतीन बहुमतात
रशियात सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून राष्ट्रपती पुतीन यांच्या युनायटेड रशिया पार्टीला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. सोमवारी रात्री उशिरा मतमोजणी पूर्ण झाली त्यात पुतीन यांच्या पक्षाने ५० टक्के मते मिळविली असली तरी २०१६ च्या निवडणुकीपेक्षा ती ४ टक्के कमी आहेत. या उलट कम्युनिस्ट पक्षाने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ६ टक्के अधिक मते मिळविली असून त्याची टक्केवारी १९ टक्के आहे.
या निकालामुळे पुतीन यांचीच सत्ता रशियात राहणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी विरोधकांनी मतदानात गडबड झाल्याचे आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.पुतीन यांचे मुख्य व प्रमुख विरोधक असलेल्यांना मतदानात हिस्सा घेण्यास बंदी केली गेली होती. या विरोधकांनी निवडणुकीत जबरदस्तीने मतदान करविले गेल्याचे, मतपत्रिका बदलल्या गेल्याचे आणि मतदान बुथ वर पुतीन समर्थक बोगस मतदान करत असल्याचे आरोप केले असून त्या संदर्भात काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
पुतीन यांचे खंदे विरोधक नवलनी यांच्या समर्थकांनी हे व्हिडीओ केले असून मतदान तीन दिवस सुरु ठेवले गेल्याचे आणि मतदान केंद्रांवर पर्यवेक्षक संख्या अगदी कमी असल्याचेही आरोप केले आहेत. करोना मुळे यावेळी ई मतदानाचा पर्याय दिला गेला होता.