येतेय आशियातील पहिली स्वदेशी उडती हायब्रीड कार

आशियातील पहिली हायब्रीड फ्लाईंग कार विनाता एरोमोबिलीटीच्या युवा टीमने तयार केली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी त्यांच्या ट्विटर अकौंटवर मेड इन इंडिया अंतर्गत बनलेल्या पहिल्या हायब्रीड फ्लाईंग कार मॉडेल बद्दल आनंद व्यक्त केला आहे.

भविष्यातील वाहतूक या विषयावर जगभरात प्रयोग सुरु आहेत आणि भारत त्यात मागे नाही. काही दिवसांपूर्वी सरकारने ड्रोन नीतीसंदर्भात घोषणा केली आहे. आता विनाता एरोमोबीलिटीने उडत्या कारचे मॉडेल पेश केले आहे. ही कार प्रवासी नेण्याबरोबर मालवाहतूक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुद्धा वापरता येणार असल्याचा दावा केला जात आहे.

५ ऑक्टोबरला लंडन येथे जगातील मोठे हेलीटेक प्रदर्शन होणार आहे. त्यात एरियल मोबिलिटी कंपनी विनाता हाय इलेक्ट्रीकल ईव्हीटोल कॉन्सेप्ट एअर कार्गो अँड पॅसेंजर एअरक्राफ्ट सादर करणार आहे. आशिया खंडातील ही पहिली कार दोन सिटर असून ती वीज आणि जैव इंधन अशी दोन्हीवर चालणार आहे. या कारचे वजन ११०० किलो असून १३०० किलो वजन ती वाहून नेऊ शकते.

या कारला एआय सह डिजिटल इन्स्ट्रुमेंटल पॅनल दिले असल्याने उड्डाण करणे, कार चालविणे टेन्शन फ्री आहे. यात जीपीएस ट्रॅकर बरोबर मनोरंजनाची सोय आहे आणि पॅनोरॅमिक व्ह्यू साठी कॅनोपी आहे. या कारची रेंज १०० किमीची असून टॉप स्पीड ताशी १२० किमी आहे. सलग ६० मिनिटे ती ३ हजार फुट उंचीवरून उडू शकते. प्रवासी सुरक्षेसाठी इजेक्शन पॅराशूटसह एअरबॅग इनबिल्ट कॉकपिट आहे. कारमध्ये अनेक प्रोपेलर आणि मोटर्स आहेत त्यामुळे समजा काही प्रोपेलर, मोटर बंद पडले तरी बाकी प्रोपेलर आणि मोटर्सच्या सहाय्याने सुरक्षित उतरणे शक्य होणार आहे असे समजते.