डेंग्यूच्या नव्या सिरोटाईप टू स्ट्रेनचा धोका वाढला

करोनाची साथ अजून संपुष्टात आलेली नाही आणि तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असतानाच देशात डेंग्यूच्या धोकादायक सिरोटाईप टू स्ट्रेनचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे. यामुळे देशातील ११ राज्यांना अॅलर्ट दिला गेला असून स्वास्थ्य विभागाने नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

दरवर्षी पावसाळा संपताना देशात सप्टेंबर आक्टोबर महिन्यात डेंग्यू साथ येते. एडीज डास चावल्याने हा रोग होतो. रिपोर्ट नुसार सध्या देशात ११ राज्यात डेंग्यूचे गंभीर संक्रमण असून नवा स्ट्रेन सिरोटाईप टू आढळला आहे. डेंग्यूचे अनेक स्ट्रेन असले तरी सिरोटाईप टू अधिक धोकादायक मानला जातो. डेंग्यूचे डास स्वच्छ आणि स्थिर पाण्यात वाढतात. त्यामुळे घरात, घराबाहेर पाण्याची डबकी साठू न देण्याची खबरदारी घ्यावी लागते. हे डास दिवसाच चावतात त्यामुळे शरीर पूर्ण झाकेल असे कपडे घालणे योग्य ठरते.

अमेरिकेतील एका जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या अध्ययनानुसार सिरोटाईप टू प्रकार अतिशय धोकादायक असून त्यामध्ये मृत्यूची शक्यता वाढते. या संसर्गामुळे अनेक कॉम्प्लीकेशन रूग्णांमध्ये तयार होऊ शकतात जी घातक ठरतात. रक्तस्त्राव आणि ताप हे कारण सर्वात गंभीर ठरते. यात रक्तदाब वेगाने घसरतो, प्रचंड ताप येतो, लसग्रंथीना नुकसान पोहोचते त्यामुळे नाकातून रक्त येऊ लागते किंवा त्वचेखाली रक्ताचे धब्बे जमू लागतात. रूग्णाला अन्य आजार असतील तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

यासाठी ताप येताच सर्वप्रथम रक्त तपासणी करून डेंग्यूची पुष्टी झाल्यास रुग्णाच्या लक्षणानुसार उपचार सुरु केले जातात. डेंग्यूवर खास कोणतेही औषध नाही. रुग्णाला पूर्ण आराम करावा लागतो असे सांगण्यात येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही