कार्पोरेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात पुढील वर्षी होणार घसघशीत वाढ


नवी दिल्ली – पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये सरासरी 8.6 टक्के पगारवाढ कार्पोरेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळण्याचा अंदाज आहे. ही बाब डेलॉयटच्या एका सर्वेक्षणामध्ये समोर आली आहे. 2021 मध्ये भारतीय कार्पोरेट कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सरासरी 8 टक्के पगारवाढ दिल्यामुळे पुढील वर्षी ही वाढणारी पगारवाढ चांगल्या अर्थव्यवस्था आणि बाजारपेठेतील सुधारणा याचे संकेत मानले जात आहे.

कर्मचारी आणि पगारवाढीच्या डेलॉयटच्या सर्वेक्षणामध्ये 2021 च्या सेकंड फेजनुसार 92 टक्के कंपन्यांनी यंदा आठ टक्के पगारवाढ दिली. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या जवळपास 25 टक्के कंपन्यांनी पुढील वर्षी दुहेरी अंकात पगारवाढ देण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर 2020 मध्ये केवळ 60 टक्के कंपन्यांनी पगारवाढ दिली होती. कोरोना महामारीच्या आधी म्हणजे 2019 मध्ये कंपन्यांनी 8.6 टक्के पगारवाढ दिली होती.

जुलै 2021 पासून हे सर्वेक्षण सुरु करण्यात आला. सुरुवातीला मोठमोठ्या कंपन्यांच्या अनुभवी एचआरची मते नोंदविण्यात आली. यामध्ये 450 हून अधिक कंपन्यांचा सहभाग होता. या कंपन्या ही पगारवाढ कर्मचाऱ्याचे कौशल्य आणि प्रदर्शन यावरून देणार आहेत. सर्वात चांगले प्रदर्शन करणाऱ्या कर्मचाऱ्याला सरासरीपेक्षा 1.8 पटींनी जास्त पगारवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

डेलॉयट टच तोहमत्सु इंडिया एलएलपीचे पार्टनर आनंदोरूप घोष यांच्या माहितीनुसार अधिकांश कंपन्या 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये चांगली पगारवाढ देण्याच्या मूडमध्ये आहेत. या कंपन्या कोरोनामुळे अनिश्चितता असतानाही काम करत आहेत. कंपन्यांनाही यंदाचा व्यवसाय किती होईल, याचा अंदाज नाही. तरी देखील काहींनी सकारात्मकता दाखविली आहे. अशा काही कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 2021 मध्ये देखील पगारवाढ दिलेली नाही.