…तर ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही : किरीट सोमय्या


कराड : मला अंबाबाईचे दर्शन हसन मुश्रीफांमुळे करता आले नाही. घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणारे हे ठाकरे सरकार असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मला कोणत्या आदेशाअंतर्गत पोलिसांनी मला गणेश विसर्जनापासून रोखले. काल सहा तास मला कोंडून ठेवण्यात आले. हात जोडून मी विनंती केली की ऑर्डर दाखवा. पुराव्यासह मी कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो, पण मला अडवले गेल्याचेही ते म्हणाले.

पोलिसांनी सीएसएमटी स्टेशनवर मला धक्काबुक्की देखील केली. मुख्यमंत्र्यांचे मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्याचे आदेश मला पोलिसांनी दाखवले, असेही सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्विकारावी, असे ते म्हणाले. सत्तेसाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. आम्ही उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा चालून देणार नसल्याचेही ते म्हणाले. पोलिसांच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही ते म्हणाले. माझ्यावर हल्ला व्हावा ही सरकारची इच्छा आहे का? असा सवालही ते म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांना मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर कोल्हापुरात जाण्यापासून पोलिसांनी रोखले. पोलिसांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये उतरले. किरीट सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

सोमय्या म्हणाले की, मी ठाकरे सरकारचा उद्धटपणा चालू देणार नाही, मी याविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे. पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, बोगस ऑर्डर दाखवणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. आदेशात नक्की काय लिहिले आहे याविषयी अद्यापही आपणाला नीट कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आपणाला कायदा व सुव्यवस्थेच्या कारणामुळे मुंबईबाहेर जाता येणार नाही, अशी माहिती पोलिसांनी मला दिली. ते हेही म्हणाले की तुमच्यावर गनिमी काव्याने हल्ला होऊ शकतो. जर असे होते, तर मग तुम्ही माझ्या सुरक्षा यंत्रणेला याविषयीची माहिती का दिली नाही? असा सवालही सोमय्या यांनी केला.

कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला मज्जाव केला होता. तरीही ते कोल्हापूरला रवाना झाले. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर किरीट सोमय्या दाखल झाले, त्यावेळी त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त होता. त्यांना पोलिसांनी अडवले होते. पण पोलिसांना अडवू नका अशी विनंती सोमय्यांनी केली आणि महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना कराड रेल्वे स्थानकात रोखले. रात्रभर हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला.

पोलिसांनी अडवल्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार मला एवढे घाबरले आहे की, आता मला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी लावली आहे. प्रशासन किंवा पोलिसांसोबत माझे भांडण नाही. त्यांनी मला सांगितले आहे की, कराड पोलीस स्टेशनला उतरावे. मी तशापद्धतीने उतरणार आहे. कोल्हापुरात अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी मी जाणार आहे. आज त्यांनी मला थांबवले, मी दोन दिवसांनी पुन्हा येणार. ते पुढे बोलताना म्हणाले की, मी घोटाळे समोर आणतो आहे, हसन मुश्रीफ यांचा पहिला घोटाळा, दुसरा घोटाळा, तिसरा घोटाळा त्यासाठी कोणत्याही गनिमी काव्याने येण्याची काहीही गरज नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात किरीट सोमय्या यांनी येऊ नये, यासाठीचे आदेश जिल्हा प्रशासनाने देखील दिले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले होते. सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्यामुळे दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला प्रशासनाने असमर्थता दर्शवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा विरोध पाहता दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना विनंती होती.

दरम्यान, हा हायव्होल्टेज ड्रामा काल रात्रीपासून सुरु आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपण कोल्हापूरला जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस पाठवली आणि त्यामध्ये नमूद केले की, हसन मुश्रीफ आणि त्यांचे कार्यकर्ते येथे मोर्चा काढणार आहेत आणि राष्ट्रवादी या मोर्चाचे स्वागत करणार असल्यामुळे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, अशा पद्धतीचा मजकूर होता.

तसेच यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये, कोल्हापूर जिल्हा बंदी असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काल दुपारपासूनच किरीट सोमय्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला होता. तसेच त्यांना ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांपासून इतर भाजप नेते तिथे दाखल झाले आणि त्या सर्वांनी किरीट सोमय्या यांना मुंबईतून बाहेर जाण्यापासून कोणीच रोखू शकत नसल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर किरीट सोमय्याही आक्रमक झाले होते.