हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांविरोधात ठोकणार 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा


मुंबई : हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांनंतर तात्काळ पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. माध्यमांशी संवाद साधून किरीट सोमय्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर हसन मुश्रीफ यांनी गंभीर आरोप केले. तसेच किरीट सोमय्यांनी केलेले सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले. मला डेंग्यू झाला होता, आता प्रकृती स्थिर असली तरी अशक्तपणा आहे. किरीट सोमय्या यांचा मी आभारी आहे की, त्यांनी माझ्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या. किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून जे काही आरोप करत आहे, त्यामागे भारतीय जनता पक्षाचे फार मोठे षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माईंड आहेत. तसेच आपण किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून जे काही आरोप करत आहेत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचे फार मोठे षडयंत्र आहे. विशेषतः याचे खरे मास्टर माईंड चंद्रकांत पाटील हे आहेत. तुमच्यासमोर आणि जनतेसमोर मी अनेकदा माझे नेते (शरद पवार), महाविकास आघाडी सरकार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत, परमबीर सिंह प्रकरणी, तसेच केंद्रीय तपासयंत्रणांच्या गैरवापराबाबत सातत्याने पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. तसेच मी याबाबत सातत्याने आवाज उठवल्यामुळेच भाजपचे नेतेमंडळी सातत्याने मला कसे थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते आणि त्यासाठी किरीट सोमय्यांचा वापर केला.

चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्यासाठी चिंतेचा विषय म्हणजे, ज्या ठिकाणी ते प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी भाजप भुईसपाट झालेला आहे. हा कुणी भुईसपाट केला, तर हसन मुश्रीफ यासाठी मुख्य कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली होती. मी त्यांना त्यावेळी पवार एके, पवार असे सांगितल्यानंतर त्यांनी आयकर विभागाची धाड टाकली. विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी हे कारस्थान त्यांनी केले, असा आरोप मुश्रीफांनी केला आहे.

मुश्रीफ म्हणाले की, सातत्याने किरीट सोमय्या सांगतात की, मी ही कागदे काढतो आणि फडणवीसांकडे घेऊन जातो. पुढे ते सांगतात तसेच मी करतो. चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थाने लढावे, असे कुणाचातरी वापर करुन बदनामी करुन, माझ्या कुटुंबियांची बदनामी करुन त्यांना काहीही मिळणार नाही. माझ्यावर करण्यात येत असलेले सगळे आरोप खोटे आहेत. बिनबुडाचे आहेत. या आरोपांचा मी मागेही निषेध केला होता आणि 100 कोटी रुपयांचा फौजदारी अब्रूनुकसानीचा दावा करायचे मी ठरवलेले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, आजही सोमय्यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आणि खोटा आहे. त्यांच्या या खोट्या आरोपांमुळे त्यांची सीएची पदवी खरी आहे का? असा प्रश्न पडतो. त्यांना मला एवढेच सांगायचे आहे की, मी तुमच्याकडे एकदा सीए पाठवतो आणि माझ्यावर जे दोन आरोप केले आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती घेतल्यावर त्यांच्या लक्षात येईल की, हसन मुश्रीफ हा कसा माणूस आहे.

भाजपमधील नेते मला सांगतात, आम्ही सोमय्यांना म्हणत होतो मुश्रीफांच्या नादाला लागू नका. गरीब आणि सामान्य जीवाभावाचे लोक माझ्यासोबत आहेत. काल आरोप केला त्याबद्दल त्यांनी माफी मागायलाच हवी. आज त्यांनी अप्पासाहेब नलावडे कारखान्याच्या घोटाळ्याबाबत बोलले. पण ब्रिक्स इंडिया कंपनी आणि माझा, माझ्या जावायाचा काही संबंध नाही. मी सगळे डॉक्युमेंट काढले, ब्रिक्स इंडिया कंपनी ही 44 लाख कॅपिटलची कंपनी आहे, ही शेल कंपनी नाही, त्याचे शेअर कॅपिटल 1 लाख आहे, मग 100 कोटीचा घोटाळा होईल कसा? हा कारखाना शासनाने 2012-13 मध्ये ब्रिक्स फॅसिलिटीला 10 वर्षांसाठी सहयोगी तत्वावर चालवायला दिला होता. ते म्हणतात 2020 ला दिला. सोमय्यांनी अभ्यास करायला हवा होता, ही कंपनी 2020 मध्ये त्यांनी सोडली. दोन वर्ष आधीच 43 कोटीला दहा वर्षापूर्वी घेतला, तोटा होत असल्यामुळे दोन वर्षापूर्वीच कंपनीने कारखाना सोडला. 2020 ला कारखाना घेतला नाही, 2012-13 मध्ये राज्य सरकारकडून सहयोगी तत्वावर घेतला, पण नुकसानीमुळे दोन वर्ष आधीच कारखाना सोडला, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.