गणपती विसर्जनादरम्यान मुंबईत पाच जण बुडाले, तर दोघांना वाचवण्यात यश


मुंबई – गणेश विसर्जनादरम्यान मुंबईत पाच मुले समुद्रात बुडाल्याची बातमी समोर येत आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी वर्सोवा जेट्टी येथे रविवारी (१९ सप्टेंबर) समुद्रात उतरलेले पाच जण समुद्रात बुडाले आहेत. त्यापैकी, दोन मुले बचावली असून तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. याबाबतची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

स्थानिकांनी समुद्रात बुडालेल्या पाच जणांपैकी दोघांना वाचवले आणि त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मुंबई अग्निशमन दल उर्वरित तिघांचा शोध घेत आहे. बचाव कार्य सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. रविवारी याबाबतचे ट्विट महानगरपालिकेने केले आहे.


विसर्जनासाठी ही ठरवून दिलेली जागा नव्हती. लोकांना येथे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यावर आम्ही बंदी घातली होती. पण, तरी देखील अनेक जण येथे दाखल झाल्याचे वर्सोवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मनोज वामन पोहाणेकर यांनी सांगितले आहे. या शोध मोहिमेसाठी नौदलाचे डायव्हर्स आणि पोलिसांच्या बोटीची मदत घेण्यात आल्याची माहिती मुंबई अग्निशमन विभागाच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याने अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे.