अखेर सोनू सूदने आयकर विभागाच्या कारवाईवर सोडले मौन


२० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर अभिनेता सोनू सूदने बुडवला असल्याचा आरोप करत आयकर विभागाने सोनू सूदची चौकशी केली होती. परदेशी देणगीदारांकडून सोनूने क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून २.१ कोटी रुपये गोळा केले असून परदेशी योगदान (नियमन) कायद्याचे उल्लंघन केले असल्याचेही आयकर विभागाकडून सांगण्यात आले होते. यानंतर सोनू सूदने एक पोस्ट शेअर केली आहे. या चौकशीनंतर सोनूने एक स्टेटमेंट जारी केले आहे.


सोशल मीडियावर सोनूने एक स्टेटमेंट जारी करत काळ सर्व गोष्टींचा उलगडा करेल, असे म्हंटले आहे. प्रत्येक भारतीयांचा आशिर्वाद जेव्हा पाठिशी असतो, तेव्हा खडतर मार्गावरील प्रवासही सोपा वाटू लागतो, अशा आशयाची पोस्ट करत सोनूने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये तो म्हणाला, स्वत:ची बाजू मांडण्याची आपल्याला गरज नसते. काळ सर्व सांगतो. माझ्यापरीने आणि मनापासून मी प्रत्येक भारतीयाची सेवा करण्याची शपथ घेतली आहे. माझ्या फाउंडेशनमधील प्रत्येक रुपया एक अनमोल जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी आहे.

याव्यतिरिक्त, अनेक प्रसंगी, मी विविध ब्रॅण्डसना माझ्या कामाची फी गरजुंना दान करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. मी गेल्या चार दिवसांपासून काही पाहूण्यामुळे व्यस्त असल्याने तुमच्या सेवेत येऊ शकलो नाही. आता मी पुन्हा आलो आहे. माणुसकीसाठी माझी सेवा अशीच सुरु राहिल, असे म्हणत सोनूने दोन सुंदर ओळी लिहिल्या आहेत. कर भला, तो हो भला, अंत भले का भला. जय हिंद, असे सोनू त्याच्या निवेदनात म्हणाला आहे.