देवेंद्र फडणवीस शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात ; चंद्रकांत पाटील


पुणे : पुण्यातील पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी बरोबरच हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला. किरीट सोमय्या यांच्यावरून त्यांनी परिषदेत खळबळजनक वक्तव्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस दबंद नेते असून ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका, अजित पवारांसोबत शपथ घेणे ही कॅल्क्युलेटेड रिस्क असल्याचे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असे मोठे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप आता बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.’

अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई झाली. त्यातून वेगवेगळी माहिती देत ते मार्ग बदलू लागले आहेत. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, राष्ट्रवादीकडे गृह खाते देऊ नका.

आपल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यानंतर लगेचच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्या आरोपांची हवा काढून घेत त्यांनी मुद्द्यावर बोलण्याचे आवाहन केले. तसेच अनेकांना असे वाटते की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असे विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

माझे अंबाबाईला साकडे आहे की मुश्रीफ बरे झाले पाहिजे, त्यांनी पॅनिक नको व्हायला हसन मुश्रीफ यांना माझे नाव घेतल्याशिवाय झोपच लागत नाही. माझ्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करू शकतात. अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई झाली, पण ते माहिती देत देत सहकुटुंब गायब झाले. तसाच मार्ग मुश्रीफ यांच्याकडे असल्याचे ते म्हणाले आहेत.