उमा भारती म्हणतात; नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमच्या चपला उचलण्याचे काम करतात


भोपाळ: देशातील नोकरशाहीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ब्यूरोक्रसी म्हणजेच नोकरशाहीला त्यांनी चप्पल उचलणारे म्हटले आहे. नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमच्या चपला उचलण्याचे काम करतात, असे उमा भारती यांनी म्हटले आहे.

दारुबंदीविरोधात मध्य प्रदेशात आंदोलन सुरू करणाऱ्या उमा भारती शिवराज सरकारच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या ब्युरोक्रसीवर केलेल्या वक्तव्यामुळे आता सरकारच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. उमा भारती म्हणाल्या की, नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमची चप्पल उचलण्यासाठी आहे. ते आमच्या चपला उचलतात. तुम्हाला काय वाटते नोकरशाह नेत्याला फिरवतात, तसे अजिबात नाही.

आधी खाजगीत चर्चा केली जाते, नंतर नोकरशाह फाइल बनवून आणतात. आमच्या सांगण्याशिवाय ते काहीच काम करत नाहीत. त्यांना आम्ही त्याचा पगार देतो, त्यांना पोस्टिंग देतो. आम्हीच त्यांचे प्रमोशन आणि डिमोशन करतो. त्यांना कोणताही अधिकार नाही. नोकरशाहीच्या बहाण्याने आम्हीच राजकारण करतो, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

ओबीसी महासभेच्या शिष्टमंडळाने इशारा दिला होता की, ओबीसी महासभेच्या मागण्यांवर मध्य प्रदेश सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा ओबीसी महासभा रस्त्यावर उतरून भाजप खासदार, आमदार आणि मंत्र्यांचा तीव्र विरोध करेल. या दरम्यान, उमा भारती यांनी ओबीसी महासभेच्या शिष्टमंडळाशी बोलताना नोकरशाहीवर आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.