बीसीसीआयकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना दिलासा


मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनामुळे विस्कळीत झाले आहे. याचा मोठा फटका क्रिकेट विश्वालाही बसला आहे. मागील वर्षातील बराच काळ कोरोनामुळे क्रिकेट बंद होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु झाले. पण देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा होऊ शकली नव्हती. रणजी ट्रॉफी स्पर्धेचा मागील सिझन देखील स्थगित करण्यात आला होता. देशांतर्गत क्रिकेट बंद असल्यामुळे त्यावर उपजिवेकेसाठी अवलंबून असणाऱ्या क्रिकेटपटूंना अडचणीचा सामना करावा लागत होता.

बीसीसीआयने या क्रिकेटपटूंना दिलासा दिला आहे. बीसीसीआयने नुकतीच या खेळाडूंची बहुप्रतिक्षित पगारवाढ जाहीर केली आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च कौन्सिलची बैठक सोमवारी पार पडली या बैठकीत खेळाडूंच्या मॅच फिसमध्ये वाढ करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याबाबतची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे.


बीसीसीआयच्या नव्या वेतनपद्धतीनुसार 40 पेक्षा जास्त मॅच खेळलेल्या खेळाडूंना 60 हजार रूपये, 23 वर्षांखालील क्रिकेटपटूंना 25 हजार तर 19 वर्षांच्या खालील क्रिकेटपटूंना 20 हजार रुपये मॅच फिस देण्यात येणार असल्याची घोषणा जय शहा यांनी केली आहे. त्याचबरोबर जे क्रिकेटपटू 2019-20 साली झालेल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांना 2020-21 चा सिझन रद्द झाल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून 50 टक्के मॅच फिस देण्यात येणार असल्याचे जय शहा यांनी जाहीर केले.

खेळाडूंना किमान 50 टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी, असे बीसीसीआयच्या बहुतेक सदस्यांचे मत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा घेणार होते. बीसीसीआयच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अखेर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.