विराटचा दुसरा धक्का, सोडणार आरसीबीचे नेतृत्व

टी २० कप्तानपदाचा राजीनामा दिल्यावर विराट कोहलीने आणखी एक धक्का देताना आयपीएल २०२१ संपल्यावर रॉयल चॅलेंजर बंगलोर टीमच्या नेतृत्व पदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली आहे. गुरुवारी त्याने टी २० टीम कप्तानपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. विराट २०१३ पासून रॉयल चॅलेंजर बंगलोरचा कप्तान आहे मात्र आयपीएलच्या नउ सिझन मध्ये त्याला टीम साठी एकही खिताब मिळविता आलेला नाही. २०१६ च्या सिझन मध्ये बंगलोर टीम फायनल मध्ये गेली होती पण त्यांना चँपियनशिप मिळविता आली नव्हती.

आरसीबीचे कप्तानपद सोडण्याची घोषणा करताना विराट म्हणाला,’ माझ्यासाठी हा सर्व काळ चांगला होता. या टीममध्ये प्रतिभावान खेळाडूंचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. हा सगळा अनुभव मस्त होता आणि त्याबद्दल टीम व्यवस्थापक, कोच, सपोर्ट स्टाफ, खेळाडू, आरसीबी परिवारला धन्यवाद. नेतृत्व सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता मात्र फ्रेन्चाईजीच्या चांगल्या भविष्यासाठी तो आवश्यक होता. क्रिकेट मधून निवृत्त होईपर्यंत याच टीमकडून खेळत राहीन.’

विराटने १३२ सामन्यात या टीमचे नेतृत्व केले असून त्यात ६० विजय, ६५ पराजय, ३ टाय तर ४ सामने अनिर्णीत राहिले आहेत. आरसीबी साठी त्याने एकूण १९९ सामने खेळताना ६०७६ धावा काढल्या आहेत. सोमवारी कोलकाता टीम बरोबर होत असलेला सामना विराटचा २०० वा सामना आहे. कप्तानपदाच्या १३२ सामन्यात त्याने ४६७४ धावा काढल्या असून त्यात पाच शतके आहेत.