ऑफिसमध्ये स्टायलिश दिसायचे असल्यास हे पर्याय निवडा


रोज सकाळी ऑफिस ला जाताना काय वेशभूषा करावी हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक ऑफिस-गोअरला पडतोच, विशेषतः महिलांना तर हा प्रश्न दररोजच भेडसावत असतो. सकाळची पंधरा ते वीस मिनिटे कपाटासमोर केवळ हाच विचार करण्यात जातात, की आज ऑफिसला काय कपडे करून जावे ! ऑफिससाठी आवश्यक म्हणून भरपूर कपड्यांची खरेदी करून देखील ऐनवेळी आपल्यासमोर फार कमी पर्याय असल्यासारखे वाटते. पण या बाबतीत काही उपाय अवलंबले, तर जास्त वेळ खर्च न करता देखील आपण ऑफिस साठी स्टायलिश वेशभूषा करू शकता.

आपल्या संग्रही एक काळी ट्राऊझर नेहमी ठेवा, तसेच बेज आणि ग्रे कलरच्या ट्राऊझर्स देखील असाव्यात. बहुतेक कलरचे शर्टस् या ट्राऊझर्सना साजेसे दिसतात. कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये शक्यतो फॉर्मल पोशाख केला जात असल्याने ट्राऊझर्स आणि शर्टस् ची रंगसंगती विचारपूर्वक करावी लागते. महिलांनी देखील आपल्या संग्रही काळी, पांढरी आणि बेज कलरची ट्राउझर अवश्य ठेवावी. त्यावर अनेक रंगाच्या शर्टस् ची रंगसंगती जुळविता येते. तसेच ट्राउझर आणि शर्ट बरोबर निरनिराळ्या रंगांचे स्कार्फ देखील तुमच्या पोशाखाला आगळा लुक देऊ शकतात.

देशी पोशाख पसंत करणाऱ्या महिलांनी पांढऱ्या, काळ्या आणि बेज कलर्स च्या पालाझो, किंवा लेगींग्स संग्रही ठेवाव्यात. बहुतेक रंगांचे कुर्ते या रंगांवर मॅच होतातच. जर आपल्या ऑफिसमध्ये पेहरावाविषयी काटेकोर, अलिखित नियम नसतील, म्हणजेच आपल्या ऑफिसमध्ये कॅज्युअल ड्रेसिंग देखील चालत असेल, तर डेनिम जीन्स वर निरनिराळे शर्टस् किंवा टी शर्टस् हा पर्याय आहे. टी शर्टस् च्या ऐवजी कुर्ते देखील वापरता येतील.

आपण ऑफिससाठी कोणत्या प्रकारची पादत्राणे वापरता याचा ही विचार करायला हवा. तसेच आपण रहात असलेल्या ठिकाणच्या हवामानाचा देखील विचार करायला हवा. महिलांनी बेलीज, स्टिलेटोज ( उंच टाचांचे सँडल्स ) आणि फ्लॅट चप्पल आपल्या संग्रही जरूर ठेवाव्यात. ट्राऊझर्स घालणार असाल तर बेलीज घालाव्यात, जर फॉर्मल स्कर्ट आणि शर्ट असेल, तर स्टिलेटोज वापरणे चांगले, जर कुर्ता सलवार असेल, तर फ्लॅट्स वापरणे चांगले. पुरुषांनी देखील काळ्या आणि ब्राऊन शूज चा जोड संग्रही ठेवावा. आपल्या पेहरावाला साजेल असा रंग निवडावा. पेहराव कॅज्युअल असेल, तर जीन्स सोबत स्लीप ऑन सुएड शूज चांगले दिसतात.

Leave a Comment