विमान प्रवासासाठी जात आहात? मग ‘या’ गोष्टी टाळा


आजकाल ‘ लो कॉस्ट ‘ एअरलाईन्सची इतकी रेलचेल असल्यामुळे एका ठीकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे आता सहज शक्य झाले आहे. तसेच रेल्वे आणि या लो – कॉस्ट एअरलाईन्स च्या विमान तिकिटांच्या किंमतीमध्ये फारसा फरक न राहिल्यामुळे, व रेल्वे प्रवासाला लागणारा वेळ निम्म्याहूनही अधिक वाचत असल्याने, लोक विमान प्रवासाला अधिक पसंती देताना दिसत आहेत. विमान प्रवास करीत असताना विमानामध्ये पाळावयाच्या सुरक्षेसंबंधीच्या नियमांची माहिती एअर होस्टेस विमानामध्ये देतातच, पण त्या सूचनांच्या शिवाय काही गोष्टींची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.

विमानामध्ये प्रवाश्यांसाठी असणाऱ्या सीट्स फार जास्त ऐसपैस नसतात. त्यामुळे अनेक व्यक्तींना स्नायू आखडणे, पायांना मुंग्या येणे, कंबर किंवा पाठ दुखी सुरु होणे, पायांवर सूज येणे अश्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे जर विमान प्रवास दोन तासांपेक्षा अधिक काळाचा असेल, तर मधल्या काळामध्ये आपल्या जागेवरून उठून थोडेसे चाला. त्यामुळे शरीरातील स्नायूंची हालचाल होते, व स्नायू आखडत नाहीत. तसेच पायांकडील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने झाल्यामुळे पायांवर सूज ही येणार नाही. त्याचप्रमाणे प्रवास करताना आपण घातलेले कपडे फार घट्ट न असता, सैल, हवेशीर असावेत.

विमानामध्ये असलेल्या वातानुकुलित यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या हवेने त्वचा कोरडी पडत असते. त्यामुळे विमानात बसल्यानंतर लगेचच चेहऱ्याला, व हाता – पायांना मॉईश्चरायझर लावावे. तसेच चांगल्या सनस्क्रीनचा देखील वापर अवश्य करावा. विमानामध्ये हवेच्या दबावामुळे कान बंद होत असतात. त्यामुळे सतत थोडे थोडे पाणी पीत राहावे. विशेषतः लहान मुलांना कान बंद झाल्याने कान दिखी सुरु होऊ शकते, त्यामुळे त्यांनाही सतत थोडे थोडे पाणी पाजत राहावे, किंवा एखादे चॉकलेट चघळण्यास द्यावे.

विमान प्रवासादरम्यान मद्यपान करणे टाळावे. विमानाच्या केबिन मध्ये हवेचा दबाव कमी असल्याने मद्याची धुंदी अधिक लवकर चढते. याचा त्रास मद्यप्राशन करणाऱ्या प्रवाशाला स्वतःला आणि इतर सह-प्रवाशांना होऊ शकतो. तसेच विमान प्रवासामध्ये चहा, किंवा कॉफी घेणे शक्यतो टाळा. विमानांमधील नळाच्या पाण्यामध्ये भरपूर बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते. त्यामुळे जरी तहान लागली, तरी सील असलेल्या बाटल्यांमध्ये किंवा कॅन्समध्ये उपलब्ध असणारी पेये घ्यावीत.

विमानामध्ये अन्नपदार्थ ठेवण्यासाठी प्रत्येक सीटला ट्रे टेबल असते. पण या ट्रे टेबलचा उपयोग लोक अनेक इतर कारणांसाठी ही करत असतात. अगदी स्वतःचे मोबाईल फोन त्यावर ठेवण्यापासून, ते लहान मुलांनी वापरलेले डायपर ठेवण्यासाठी देखील प्रवासी ह्या ट्रे टेबलचा वापर करताना दिसतात. खरेतर विमानांची स्वच्छता होताना ही ट्रे टेबल्स सुद्धा निर्जंतुक करणे अगत्याचे असते, पण बहुतेक वेळी असे केले जात नाही. त्यामुळे आपण खात असलेले अन्नपदार्थ सरळ ट्रे टेबलवर ठेवून खाणे टाळावे. त्याऐवजी एखादी पेपरप्लेट वापरावी. अन्नपदार्थ शक्यतो ट्रे टेबलवर ठेऊ नयेत.

अनेक प्रवासी कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर करतात. विमानातील वातानुकुलीत यंत्रणेमुळे विमानतील हवा कोरडी असते. त्यामुळे डोळे कोरडे पडून डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळे खाजणे अश्या तक्रारी उद्भवू शकतात. कॉन्टॅक्ट लेन्स घातलेली असताना सतत डोळे पुसणे किंवा डोळे चोळणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे विमान प्रवास करताना लेन्सेसच्या ऐवजी चष्मा वापरावा.

Leave a Comment