महिला लसीकरण विशेष सत्रात मुंबईतील 1.27 लाख महिलांचे लसीकरण


मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत शुक्रवारी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवण्यात आले होते. त्यानुसार एकूण 1 लाख 27 हजार 351 महिलांचे शुक्रवारी लसीकरण करण्यात आले आहे. यात लसीकरण केंद्रावर थेट येऊन (वॉक इन) कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेण्याची मुभा महिलांना देण्यात आली होती.

महिला लसीकरण विशेष सत्रात काल एकूण 1 लाख 27 हजार 351 लसी देण्यात आल्या. त्यामध्ये महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावर एकूण 1 लाख 07 हजार 934 लसी देण्यात आल्या.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोरोना लसीकरण सत्र शुक्रवारी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत राबवण्यात आले होते.

मुंबईतील सर्व प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबतच सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालये आणि कोरोना सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येऊन (वॉक इन) महिलांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येईल, असे व्यवस्थापन करण्यात आले होते. काल फक्त महिलांना लस दिली जाणार असल्यामुळे ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली होती.