अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा


अमृत्तसर – आज अखेर आपल्या मुख्यमंत्री पदाचा पंजाबचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. सकाळपासूनच पंजाबमधील राजकीय हालचालींना वेग आला होता. पक्षश्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आग्रही भूमिका घेतली गेल्याची आणि राजीनामा देणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. पण, अखेर संध्याकाळी अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला आहे. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीबाबत देखील सूचक संकेत दिले आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत आपल्या राजकीय भवितव्याविषयी देखील सूतोवाच केले. पण, त्यांनी त्याआधी काँग्रेस हायकमांडविषयी देखील नाराजी व्यक्त केली. सकाळी मी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो होतो. त्यांना सांगितल होते की मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा हे होत आहे. त्यांनी तीन वेळा आमदारांना दिल्लीत बोलवून मीटिंग केली. मला वाटते की माझ्यावर त्यांना संशय आहे की मी सरकार चालवू शकलो नाही. मला अपमानित झाल्यासारखं वाटत असल्याचे अमरिंदर सिंग यावेळी म्हणाले.

दरम्यान, आपल्यानंतर आता हव्या त्या व्यक्तीला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री करावे, अशा शब्दांत अमरिंदर सिंग यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तुम्ही आमदारांना दोन महिन्यांत तीन वेळा दिल्लीला बोलवल्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आता ज्यांच्यावर त्यांना विश्वास असेल, त्यांना मुख्यमंत्री करतील. जे काही कारण असेल, त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी निर्णय घेतला आणि ठीक असल्याचे ते म्हणाले.

कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. खुद्द अमरिंदर सिंग यांनी याविषयी स्पष्ट अशी कोणती भूमिका मांडली नाही. पण, तरीदेखील त्यांनी आपल्या भावी राजकीय वाटचालीविषयी सूचक वक्तव्य केले आहे. भावी वाटचालीसाठी माझ्याकडे नेहमीच पर्याय असणार आहेच. त्याविषयी मी भविष्यात निर्णय घेईन. ५२ वर्ष मला राजकारणात झाली आहेत. त्यातील ९.५ वर्ष मी मुख्यमंत्री राहिलो आहे. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलेन आणि नंतर पुढचा निर्णय घेईन, असे ते म्हणाले.