अजित पवारांना उपटले अधिकाऱ्यांचे कान; माझ्यासोबत माझ्या गतीने कामे करा


पुणे – आपल्या बेधडकपणे बोलण्याच्या शैलीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे ओळखले जातात. शनिवारी बारामतीमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. अजित पवारांनी बारामतीमधील नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली होती. या कार्यक्रमावेळी त्यांनी खरेदी विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांना अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना सूचना देताना त्यांचे कान उपटले आहेत. मला कसलीही कारणे तुम्ही सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, असे अजित पवार पदाधिकाऱ्यासह अधिकाऱ्यांना म्हणाले.

पेट्रोल पंपाच्या परवानगीच्या कामात उशीर होत असल्याबद्दल यावेळी कारण सांगण्यात आले. त्यावेळी अजित पवारांनी मला कारणे सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, लागेल तिथे सहकार्य करु, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आहेत. तुम्ही ना काहीजण माझ्या गतीने कामे करा म्हणजे कामे होतील. ही काय पद्धत झाली? अधिकाऱ्यांना भेटा, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

व्यवस्थापकीय संचालकांना माझी विनंती आहे की, माझी स्वतःची गाडी जरी पेट्रोल डिझेल भरायला आली, तरी बिल द्यायचे, उधारी घ्यायची नाही. काहीही घ्यायला आले, तरी अजिबात उधारीचा धंदा नको आहे आपल्याला, अशी सूचना अजित पवार यांनी केली आहे.

यावेळी बोलताना केंद्र सरकारने जवळपास जिल्हा बँक चालवण्याचा अधिकार काढून घेतला असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. जिल्हा सहकारी बँकेवर केंद्र सरकारने निर्बंध घातले आहेत. त्याच्या विरोधात राज्य सरकार न्यायालयात जाणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. बरेच नविन बदल केंद्र सरकारने केले आहेत. त्याकरिता आम्ही न्यायालयात जाणार आहोत. बॅंक चालवण्याचा जिल्ह्याचा अधिकार जवळपास काढून घेतला आहे.

चांगल्या पद्धतीने बँक चालवण्याचा आम्ही प्रयत्न केला. पहिल्या पाच बँकांमध्ये सातारा आणि पुणे जिल्हा बँकेंचा समावेश होतो. पण तरीदेखील सहकारी बँकामधील अर्थव्यवस्था स्वतःच्या ताब्यात यावी अशा प्रकारचा केंद्राचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्या विरोधात आम्ही चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊन सहकार विभागाच्या वतीने पुढे कसे जायचे याचा विचार करीत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.